तालुक्यातील कोरेगाव येथील एका दलित कुटुंबाला पुणे जिल्ह्य़ातील वीटभट्टी मालकाने पैशांसाठी ओलीस ठेवले आहे. या पती-पत्नीसह दोन मुलींना एका खोलीत कोंडून ठवण्यात आले असून येथे त्यांचा छळ सुरू आहे.
विनोद बबन वळू (वय ३५), त्यांची पत्नी निता विनोद वळू (वय ३०), मुली अमृता विनोद वळू (वय १२) व काजल नितीन ससाणे (वय १२) या चौघांना दौंड येथील गणेश तुकाराम शितोळे राहणार (आवळे-शितोळेवस्ती, पिंपळगाव, ता. दौंड) या वीटभट्टी मालकाने पैशांसाठी डांबून ठेवले आहे. या सर्वाना ते मारहाणही करीत असल्याची कैफियत विनोदचे वडिल बबन दगडू वळू यांनी मांडली आहे. याबाबत त्यांनी गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.
पाटील यांना पाठवलेल्या तक्रारीत बबन वळू यांनी म्हटले आहे की, माझे सर्व कुटुंब विटभट्टी कामगार आहे. मुलगा, सुनेसह आम्ही गणेश तुकराम शितोळे यांच्या दौंड येथील वीटभट्टीवर सन २००९ पासून काम करतो. विटभट्टी मालकाडून वेळोवेळी घेतलेले उचलीचे पैसे तेथेच काम करून आम्ही परतफेड करतो. पैशांची परतफेड केली की, मुलांच्या शाळा सुरू होताना आम्ही परत गावी येतो. यंदादेखील अशी सर्व परतफेड केली आहे. मात्र दि. २९ जुलैला गणेश शितोळे याने विटभट्टीवर येऊन कुटुंबीयांना शिवीगाळ करून माझ्यासह मुलगा, सुन व नातवंडांना गावी परतण्यास मज्जाव केला. तुम्ही गेलात तर, माझे लाखो रूपयांचे नुकसान होईल असे सांगून त्याने माझ्या मुलाकडे अवास्तव वसुलीचे पैसे दाखवले आहेत. या पैशांची परतफेड होईपयर्ंत गावी जायचे नाही असे धमकावून त्याने या सर्वाना एका खोलीत डांबून ठेवले आहे. गेले पाच, सहा दिवस या खोलितच सर्वाचा छळ सुरू असून जीवे मारण्याचीही धमकी त्याने दिली आहे. दोन दिवसांनी अंधाराचा फायदा घेऊन मी माझी सुटका करून घेत कर्जत तालुक्यात गावी आलो आहे, मात्र माझे अन्य कुटुंबीय शितोळे याच्याच ताब्यात आहेत.
या खोलितच धमकावून शितोळे याने आमच्याकडून काही कागदपत्रांवर सह्य़ाही घेतल्याची तक्रार त्यांनी केली आहे. याबाबत जवळच्या यवत पोलिस ठाण्यात जाऊन फिर्याद देण्याचा प्रयत्न केला असता ठाणे अंमलदाराने ती घेतली नाही, उलट माझ्या विरूध्दच खोटा गुन्हा दाखल करून मला हाकलून दिले अशी कैफियत बबन वळू यांनी मांडली आहे. याबाबत पुणे ग्रामीण विभागाच्या पोलिस अधीक्षकांना अर्ज करूनही न्याय मिळालेला नाही. शितोळेच्या तावडीतून माझ्या कुटुंबियांची सुटका करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी गृहमंत्री पाटील यांना पाठवलेल्या निवेदनात केली आहे.