पार्थला सल्ला देणार नाही ठेच लागल्यावर तो आपोआप शहाणा होईल असं सूचक वक्तव्य राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे. पार्थ पवारसाठी शरद पवार यांनी लोकसभा निवडणुकांमधून माघार घेतली. पार्थ पवार हा अजितदादांचा मुलगा, मात्र त्याला आपण सल्ला देणार नाही असं पवारांनी म्हटलं आहे. पार्थ पवार हे मावळ मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार आहेत. त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? असं विचारल्यानंतर शरद पवार म्हटले की, मुलांना सल्ले देऊ नये, चालताना ठेच लागली की ते आपोआप शिकतात आणि शहाणे होतात.

पार्थ पवारांच्या प्रचारासाठी शरद पवारांनी मावळमध्ये सभा घेतली होती. त्या सभेला अजित पवारही हजर होते. अजित पवार आणि शरद पवार जेव्हा मंचावर होते तेव्हा पार्थ बोलण्यासाठी उभे राहिले, त्यानंतर त्यांनी जे भाषण केले त्याची सोशल मीडियावर चांगलीच खिल्ली उडवण्यात आली. भाषण करताना पार्थ पवारांचे मराठी उच्चारही वेगळे वाटत होते आणि बाबा आणि आजोबांसमोर भाषण करतो आहे याचे दडपणही त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. लोकसभेसाठी उभ्या असलेल्या उमेदवाराला साधं भाषणही करता येऊ नये का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यावर माझं हे पहिलंच भाषण होतं, मात्र भाषण करणार नाही तर काम करणार असा विश्वास पार्थ पवारांनी व्यक्त केला.

शरद पवारांनी त्यांच्या नातवासाठी माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभा न लढवण्याचा निर्णय घेतला. तसंच लोकसभा निवडणुकांमधूनही त्यांनी माघार घेतली. त्यामुळे पार्थ पवार यांच्याबाबतच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. आता भाषणाची खिल्ली तर उडवली गेली मात्र शरद पवारांना जेव्हा याबाबत विचारण्यात आलं तेव्हा मुलांना सल्ला द्यायचा नसतो, ठेच लागली की ते शिकतात आणि शहाणे होतात असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं.

शरद पवार यांनी माढा आणि उस्मानाबाद येथील उमेदवार जाहीर केले त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे सूचक वक्तव्य केले. एवढंच नाही तर यावेळी उत्तर प्रदेशात भाजपाच्या जागा कमी होतील असाही अंदाज त्यांनी वर्तवला आहे. तसंच शेतकऱ्यांशी या सरकारला काहीही घेणंदेणं नाही या सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडलं अशीही टीका त्यांनी केली.