प्रशांत देशमुख, लोकसत्ता

वर्धा : वर्धा-सेवाग्राम रस्त्याच्या मधोमध आलेली झाडे तोडण्याचा मुद्दा आता पालकमंत्र्यांच्या दारी गेला असून पर्यावरणप्रेमी व काँग्रेस नेते यांच्यातील वादाने झाडे तोडण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

सेवाग्रामकडे जाणाऱ्या रस्त्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. धन्वंतरी नगर ते पुलापर्यंतच्या रस्त्यावर काही झाडे आहेत. रस्त्याच्या मधोमध असलेली ही झाडे अपघाताला निमंत्रण देणारी असल्याचा दावा काँग्रेस नेते व एमआयडीसी उद्योजक संघटनेचे अध्यक्ष प्रवीण हिवरे यांनी केला. तर वृक्ष बचाव समितीच्या आंदोलनात अग्रभागी असलेल्या सुषमा शर्मा यांनी हा तद्दन खोटा युक्तिवाद असल्याचे सांगत बांधकामात पर्यावरणप्रेमींची फ सवणूकच झाल्याचा आरोप केला.

पालकमंत्री सुनील केदार यांना भेटून काँग्रेस नेते शेखर शेंडे व प्रवीण हिवरे यांनी ही झाडे तोडण्याची भूमिका घेतली. पर्यावरण विभागाने बांधकाम विभागाला दिलेल्या अहवालात सदर झाडे अलीकडच्या काळातील असून गांधीकालीन जुनी नसल्याचे स्पष्ट केले असल्याचे सांगितले जाते. झाडे महत्त्वाची की मनुष्याचा जीव महत्त्वाचा, असा सवाल पालकमंत्र्यांना करण्यात आला. यावेळी त्यांनी झाडे तोडण्याचे समर्थन करणाऱ्या परिसरातील तीन हजार गावकऱ्यांचे निवेदनही दिले. पालकमंत्र्यांनी वाहतुकीला अडचण निर्माण करणारी झाडे तोडण्याचे निर्देश देतानाच दहापट नवीन झाडे लावण्याची सूचना बांधकाम विभागास केल्याची माहिती हिवरे यांनी दिली.

लोकशाहीत नागरिकांची वेगवेगळी धारणा राहू शकते, असे मत व्यक्त करीत सुषमा शर्मा यांनी पर्यावरणाचा विचार नागरिकांनीच केला पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली. मुळात मंत्रालयात झालेल्या सभेत काही निर्णय एकमताने झाले होते. मात्र त्याचे पालन झाले नाही. ठरलेल्या रुंदीपेक्षा अधिकचा रुंदीचा रस्ता तयार करण्यात आला. त्यात झाडे तोडण्यात आली. आमची एकप्रकारे फ सवणूकच झाली. पूर्वीच्या रस्त्यापेक्षा आता दीडपट रस्ता मोठा झाला आहे. दुभाजक लावल्याने रस्ता अरुंद वाटतो. दुभाजक काढल्यास झाडे तोडण्याची गरज पडणार नाही. पण तरीही काही झाडे अडचणीची ठरत असतील, तरच आमची हरकत राहणार नाही. विरोध करणाऱ्यांनी गांधीवादी म्हणून हिणवण्याची गरज नाही. हा आजच्या पिढीच्या भविष्याचा प्रश्न आहे. मर्यादित विकास, मर्यादित वेग हे गांधींचे सूत्र काँग्रेस नेत्यांनी आठवावे. येनकेन प्रकारे सर्वच झाडे तोडण्याचा निर्णय झाल्यास आम्ही निषेध नोंदवू.

बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बूम हे म्हणाले की, विनाकारण झाडे तोडण्याची बाब कुणीच मान्य करणार नाही. पण रस्त्याच्या मधोमध असलेली झाडे रात्रीच्या वेळी निश्चितच अपघातास पूरक ठरतात. त्यामुळे झाडे तोडण्याशिवाय गत्यंतर नाही. रस्त्याची रुंदी कमी करून बहुतांश झाडे वाचवण्यात आली आहे. आताही झाडे तोडल्यास दहा पट नवे झाडे लावण्याची तयारी आहे. झाडांमुळे अपघात झाल्यास बांधकाम विभागास जबाबदार धरण्याचे पत्र पोलीस खात्याने दिले आहे. गावकऱ्यांचाही झाडे तोडण्यासाठी रेटा आहे. आता सामंजस्याची भूमिका आवश्यक ठरते, असे त्यांनी स्पष्ट केले. पोलीस, बांधकाम विभाग, गावकरी व काँग्रेस नेत्यांनी झाडं अपघातास पूरक ठरत असल्याचा जोरदार युक्तिवाद केल्याने पर्यावरणप्रेमींच्या भूमिकेकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.