News Flash

“शर्जिल व एल्गार परिषदेसाठी ठाकरे सरकारकडून पायघड्या अन् शिवजयंतीवर निर्बंध”

भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली टीका; शिवसेनेचे आणखी एक लोटांगण... म्हणत टोला देखील लगावला.

“शर्जिल व एल्गार परिषदेसाठी ठाकरे सरकारकडून पायघड्या अन् शिवजयंतीवर निर्बंध”
संग्रहीत छायाचित्र

“हिंदू समाज सडा हुवा है म्हणणाऱ्या शर्जिल व एल्गार परिषदेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारकडून कार्यक्रमासाठी पायघड्या, मात्र छत्रपती शिवरांयाच्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करायला बंधने राज्य सरकार घालते.” अशा शब्दांमध्ये भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज ठाकरे सरकारवर टीका केली आहे.

करोना संकटानंतर राज्य पूर्वपदावर येत असलं तरीही अद्याप काळजी घेण्याचं आवाहन राज्य सरकारकडून केलं जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर यंदा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साधेपणाने साजरी करावी असं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. यासंबंधीची नियमावली राज्य सरकारकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. यावरून केशव उपाध्ये यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.

“सत्तेसाठी शिवसेनेने अनेकदा काँग्रेस – राष्ट्रवादी पुढे लोटांगण घातले आहे. आता शिवजयंती साजरी करण्यावर बंधने घालून शिवसेनेने ‘घालीन लोटांगण, वंदीन चरण’ चा नवा प्रयोग सादर केला आहे.” अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.

या संदर्भात जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात उपाध्ये यांनी म्हटले आहे की, “छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यास निर्बंध घालणाऱ्या महाआघाडी सरकारने आपला खरा ‘रंग’ दाखवला आहे. हिंदू समाजाबाबत प्रक्षोभक वक्तव्य करणाऱ्या शर्जिल उस्मानीला अटक करण्यास महाआघाडी सरकार टाळाटाळ करते. सत्ता टिकविण्यासाठी शिवरायांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्या शिवसेनेने ‘घालीन लोटांगण’ चा आणखी एक प्रयोग महाराष्ट्रात सादर केला आहे.”

शिवजयंतीसाठी ठाकरे सरकारकडून नियमावली जाहीर

तसेच, “शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करण्यावर राज्य सरकार कडून अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. पोवाडे, बाईक रॅली, मिरवणूका यावर आघाडी सरकारने अनेक निर्बंध घातले आहेत. दारूची दुकाने, नाईटलाइफ, बार सुरु करण्यास परवानगी देताना सरकार गर्दीचा विचार करीत नाही. परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात करोनाच्या नावाखाली अनेक अडचणी आणल्या जात आहेत. धार्मिक भावना भडकवणाऱ्या एल्गार परिषदेला परवानगी देताना आघाडी सरकार मागेपुढे पाहत नाही. मात्र शिवजयंती राज्यकर्त्यांच्या डोळ्यात का खुपते?” असा सवालही उपाध्ये यांनी पत्रकात केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 11, 2021 7:50 pm

Web Title: keshav upadhyay criticized the state government for imposing restrictions on shiv jayanti msr 87
Next Stories
1 “गडकिल्ल्यांचे जतन संवर्धनासाठी राज्यव्यापी दुर्ग महासंघ”
2 हळदीचा मंडप उभारताना चहासाठी आवाज देऊनही मुलगी आली नाही; आत जाऊन पाहिलं तर…
3 उदयनराजेंनी सांगितलं शरद पवारांना भेटण्यामागचं कारण, म्हणाले…
Just Now!
X