‘दौलत’चे धुराडे पेटण्याची शक्यता अंधूक; विरोधकांची मोर्चेबांधणी
कुमुदा शुगर्सचे उपाध्यक्ष श्रीकांत नलवडे यांना झालेल्या अटकेच्या कारवाईमुळे कुमुदा शुगर्सच्या अस्तित्वाबरोबरच साखर उद्योगातील या महत्त्वाच्या समूहाने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेबरोबर केलेल्या दौलत सहकारी साखर कारखाना चालवायला घेण्याच्या करारावर टांगती तलवार लागली आहे. कुमुदा शुगर्सची बिघडलेली आíथक स्थिती पाहता दौलतचे धुराडे पेटण्याची शक्यता अंधूक बनली आहे. हा मुद्दा तापता ठेवत विरोधकांनी कुमुदा शुगर्सबरोबर झालेला दौलतचा करार जिल्हा बँकेने रद्द करावा यासाठी मोच्रेबांधणी सुरु ठेवली आहे.
उत्तर कर्नाटकात कुमुदा शुगर्स अॅग्रो प्रॉडक्ट या कंपनीने साखर उद्योगामध्ये दबदबा निर्माण केला आहे. या समूहाने अल्प काळात कर्नाटक, महाराष्ट्रातील अनेक सहकारी साखर कारखाने चालविण्यासाठी घेतले. सुरवातीचा उभरता काळ वगळता नंतर कुमुदा शुगर्सबाबत तक्रारींचा पाढा सुरु झाला.
भोसले-नलवडे यांच्या विरोधात दाखल झालेले विविध ठिकाणचे गुन्हे, न्यायालयातील वेगवेगळे दावे यामुळे कुमुदा शुगर्सच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कुमुदा शुगर्सने शाहूवाडी तालुक्यातील उदयसिंहराव गायकवाड कारखाना भाडेतत्वावर घेतला होता. कुमुदा शुगर्सने गायकवाड कारखान्याला दिलेला भाडयाचा रकमेचा आगाऊ धनादेश वटला नाही. त्याबाबत न्यायालयीन प्रक्रिया सुरु आहे.
चंदगड तालुक्यातील दौलत साखर कारखाना चालविण्यास घेण्यासंदर्भात कुमुदा शुगर्सने जिल्हा मध्यवर्ती बँकेला करारासाठी इच्छुक असल्याचे पत्र दिले आहे. त्यातील पहिले २५ कोटी रुपये ३० जानेवारी अखेर भरण्याचे भोसले यांचे म्हणणे आहे. आता उपाध्यक्ष अटकेत असून भोसले यांच्या हाती कधीही बेडया पडण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा बँकेबाबतच्या कराराची रक्कम मिळण्याची शक्यता कमी आहे.
कुमुदा शुगर्सचे बेळगाव जिल्हयात नाव बदनाम झाले आहे. महाराष्ट्रातही त्याच्या खुणा दिसू लागल्या आहेत. या वास्तवाकडे कानाडोळा करुन पुन्हा त्याच कुमुदाकडे दौलत चालवायला दिल्याने काहीही साध्य होणार नाही. शेतकऱ्याचे कोटयावधी रुपयांचे देणे बाकी असताना पुन्हा नव्याने शेतकऱ्याचा गळा कापण्यास परवानगी देणे सर्वथा अयोग्य असून भ्रष्ट व्यवहाराविरोधात लढा सुरु राहणार असल्याचे कारखान्याचे माजी अध्यक्ष, माजी आमदार नरसिंग पाटील यांनी शुक्रवारी लोकसत्ताशी बोलताना सांगितले. तर बँकेचे अध्यक्ष मुश्रीफ यांनी महिनाअखेर पर्यंत कुमुदाकडून पसे ठरल्याप्रमाणे पसे येतात का ते पाहू आणि त्यानंतरच निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 23rd Jan 2016 रोजी प्रकाशित
‘कुमुदा शुगर्स’चे करार अडचणीत
उत्तर कर्नाटकात कुमुदा शुगर्स अॅग्रो प्रॉडक्ट या कंपनीने साखर उद्योगामध्ये दबदबा निर्माण केला आहे.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 23-01-2016 at 01:37 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumuda sugars limited in critical condition after big scams