29 September 2020

News Flash

देशात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला

करोना आणि लॉकडाउनच्या सर्व घटनांची संक्षिप्त माहिती

महाराष्ट्रापासून ते जगभरातील करोना आणि लॉकडाउन संदर्भातील ताजे अपडेट वाचा एकाच ठिकाणी...

करोना आणि लॉकडाउन अशा दुहेरी संकटात देशातील हातावर पोट भरणारा मजुर भरडला जात आहे. हाताला काम नाही. करोनाची भीती, जेवणाची आबाळ अशा समस्यांना तोंड देत असलेले मजुर घराकडे जात आहे. मात्र, अनेक मजुरांना घरी पोहोचताच आलं नाही. लॉकडाउन लागू झाल्यापासून आतापर्यंत देशात ११९ मजुरांचा वेगवेगळ्या रस्ते अपघात मृत्यू झाला आहे.

दुसरीकडं लॉकडाउनचा तिसरा टप्पा संपत असताना करोनाग्रस्त रुग्णांची संख्याही झपाट्यानं वाढली आहे. देशातील रुग्णांची संख्या ८६ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. आतापर्यंत २,७५२ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील काही शहरांची स्थिती चिंताजनक आहे. राज्यातील करोना रुग्णांची संख्या ३० हजार ७६ इतकी झाली आहे. शनिवारी राज्यात १६०६ नवे रुग्ण आढळून आले.

Live Blog

21:48 (IST)17 May 2020
नवी मुंबईत ६२ नव्या करोनाबाधित रुग्णांची नोंद

नवी मुंबई मनापा क्षेत्रात आठवड्यापासून कोरोना रुग्णाचा आकडा पन्नासच्या खाली येत नसून रविवारीही तब्बल ६२ नागरिकांना कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे यात सर्वाधिक तुर्भे विभागात तर सर्वात कमी बेलापूर व दिघा  नोड मध्ये रुग्ण आढळून आले आहेत.

21:30 (IST)17 May 2020
चिंताजनक! मुंबईत करोनाबाधित रुग्णांच्या संख्येने ओलांडला २० हजारांचा टप्पा

महाराष्ट्रात करोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ हजारांच्या पुढे गेली आहे. दरम्यान करोनाचा हॉटस्पॉट असणाऱ्या मुंबईतील परिस्थिती चिंताजनक आहे. राज्यात गेल्या २४ तासात २ हजार ३४७ नव्या रुग्णांची नोंद झाली असून मुंबईतील रुग्णसंख्या २० हजारांच्या पुढे गेली आहे. मुंबईत सध्या करोनाचे २० हजार १५० रुग्ण आहेत. (सविस्तर वृत्त)

21:19 (IST)17 May 2020
मुंबईत पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, करोना रिपोर्टची प्रतिक्षा

दहशतवादविरोधी पथकातील ४६ वर्षीय पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. कर्मचाऱ्याला टायफाइड आणि मधुमेहाचा त्रास होता. कर्मचाऱ्याचा करोना अहवाल आला नसून त्यानंतर करोनामुळे मृत्यू झाला का हे स्पष्ट होईल.

21:18 (IST)17 May 2020
उस्मानाबाद जिल्ह्यात आणखी तीन जण कोरोनाबाधित

जिल्ह्यात आणखी तिघेजण कोरोनाबाधित झाल्याचे रविवारी समोर आले आहे. आधीच तिघे कोरोनाबाधित सापडलेल्या कळंब तालुक्यात 2 तर भूम येथे 1 कोरोनाबाधित आढळला आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधितांची संख्या 7 वर गेली आहे. आज लागण झालेले तिघेही मुंबई येथून जिल्ह्यात परतले आहेत.

20:48 (IST)17 May 2020
पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९ जण करोनाबाधित

पिंपरी-चिंचवड शहरात आज दिवसभरात ९ जण करोना बाधित रुग्ण आढळले असून, शहरातील करोना बाधितांनी दोनशेचा आकडा ओलांडला आहे. त्यामुळे शहरातील बाधितांची संख्या २०४ पोहचली आहे. आज सहा जण करोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आत्तापर्यंत एकूण -१२५ जण करोनामुक्त झाले आहेत. आज आढळलेले करोनाबाधित हे पिंपळे गुरव, संभाजीनगर चिंचवड, आनंदनगर चिंचवड स्टेशन, दिघी, विकासनगर किवळे, मोरेवस्ती चिखली येथील रहिवासी आहेत.

20:41 (IST)17 May 2020
राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ हजाराच्या पुढे

राज्यात दिवसभरात २३४७ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबत करोनाबाधित रुग्णांची संख्या ३३ हजार ०५३ इतकी झाली आहे. दरम्यान राज्यात ६३ मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या ११९८ वर पोहोचली आहे. राज्यात आज नवीन ६०० रुग्ण बरे झाले असून त्यांना घरी पाठवण्यात आले आहे. आतापर्यंत ७६८८ रुग्ण करोनामुक्त झाले असून उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. सध्या राज्यात एकूण २४ हजार १६१ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

20:30 (IST)17 May 2020
पालघरमध्ये करोनाचा तिसरा मृत्यू

पालघर तालुक्यातील करोना बाधित असलेल्या बोईसर येथील एका तरुणाचा ठाणे येथे आज सायंकाळी मृत्यू झाला. त्यामुळे पालघर तालुक्यातील या आजारामुळे मृतांची संख्या तीन वर पोहोचली आहे.

20:20 (IST)17 May 2020
चिंताजनक : पुण्यात एकाच दिवसात 201 नवे रुग्ण

पुणे शहरात दिवसभरात 201 करोनाबाधित रुग्ण आढळले. तर आज अखेर 3 हजार 496 इतकी संख्या झाली आहे. तर याच दरम्यान 9 रुग्णांचा मृत्यू झाला असून 194 मृतांची संख्या झाली. त्याच बरोबर 14 दिवसानंतर 53 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. आजअखेर 1 हजार 751 रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

20:07 (IST)17 May 2020
सोलापुरात करोनाचे दोन मृत्यू; २१ नव्या रूग्णांची भर

सोलापुरात रविवारी सायंकाळपर्यंत करोनाबाधित नव्या २१ रूग्णांची भर पडली असून दोघांचा मृत्यू झाला आहे. रूग्णांमध्ये दोघे आरोग्य कर्मचारी असून आतापर्यंत रूग्णसंख्या ३८५ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्याही दोनने वाढून २६ वर पोहोचली आहे. करोनाचा फैलाव वाढत पूर्व आणि दक्षिण भागानंतर आता पश्चिम भागातही होऊ लागला आहे. पंढरपूर तालुक्यातील टाकळी येथील आरोग्य क्षेत्रातील एक व्यावसायिक सोलापुरात न्यू पाच्छा पेठेत वास्तव्यास असताना त्याला करोनाची बाधा झाली आहे.

19:55 (IST)17 May 2020
लॉकडाउन ४ साठी केंद्राची नियमावली जाहीर; काय सुरु, काय बंद राहणार ?

केंद्र सरकारकडून लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला असून नियमावलीदेखील जाहीर करण्यात आली आहे. नव्या नियमावलीनुसार लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्यात मेट्रो, रेल्वे, विमानसेवा बंदच राहणार आहे. तसंच कॉलेज, शाळा, सिनेमागृह, धार्मिक प्रार्थनास्थळंदेखील बंदच राहणार आहेत. राजकीय कार्यक्रमांवरील बंदीही कायम राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही नियमावली जाहीर केली आहे. आंतरराज्य तसंच आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फक्त एअर अॅम्ब्युलन्सला परवानगी देण्यात आली आहे. केंद्रीय गृहममंत्रालयाने नियमावलीत हॉटस्पॉट आणि कंटेनमेंट झोनमध्ये निर्बंध कायम राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. हाय रिस्क असणाऱ्या कंटेनमेंट झोनमध्ये लॉकडाउनचं कठोरपणे पालन केलं जाणार आहे. (सविस्तर वृत्त)

18:54 (IST)17 May 2020
पनवेल तालुक्यामध्ये दिवसभरात २२ नवे करोनाबाधित, एका महिलेचा मृत्यू

पनवेल तालुक्यामध्ये रविवारी २२ नवे करोनाबाधित आढळले. खारघरमधील ३२ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू, नवीन पनवेलमधील एकाच किराणा मालच्या दुकानातील दोघांना तर चार फळविक्रेत्यांना करोनाचा संसर्ग झाल्याने खळबळ.

18:39 (IST)17 May 2020
देशात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला

करोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेला देशातील लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. यासोबत सोमवारपासून लॉकडाउनच्या चौथ्या टप्प्याला सुरुवात होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच देशाला संबोधित करताना लॉकडाउन वाढवणार असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र यावेळी त्यांनी त्यासंबंधी सविस्तर माहिती दिली नव्हती. १७ मे रोजी यासंबंधी माहिती दिली जाईल असं त्यांनी सांगितलं होतं. त्यानुसार आज घोषणा करण्यात आली असून देशात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. (सविस्तर वृत्त)

18:38 (IST)17 May 2020
चंद्रपूर जिल्ह्यातील दोन्ही पॉझिटीव्ह रुग्णांची प्रकृती स्थिर

जिल्ह्यामध्ये 13 मे रोजी आढळलेल्या दुसऱ्या पॉझिटिव्ह रुग्णाची प्रकृती स्थिर असून सध्या रुग्ण विलगीकरण कक्ष चंद्रपूर येथे  आहे. रुग्णाच्या अति जोखमीच्या संपर्कातील 7 जणांचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. तर 2 मे रोजी कृष्ण नगर येथे आढळलेला रुग्ण सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथे दाखल असून त्याची प्रकृती स्थिर आहे. 

18:19 (IST)17 May 2020
मालेगावचे आयुक्त चौथ्या दिवशी करोनामुक्त

करोनाचा उद्रेक झालेल्या मालेगावात आपत्कालीन व्यवस्थेचे नेतृत्व करणारे दस्तुरखुद्द आयुक्तच करोना बाधित झाल्याचे आढळून आल्याने जेवढी खळबळ उडाली होती,तेवढाच दिलासा देणारी बातमी आता समोर आली आहे. करोना बाधित झालेले आयुक्त चारच दिवसात करोनामुक्त झाल्याचे निष्पन्न झाल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. तर दुसरीकडे रविवारी मालेगाव शहरात नव्याने सात रुग्णांची वाढ झाल्याने शहर व तालुक्यातील करोना बाधितांची संख्या ६३३ झाली असून नाशिक जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ७८९ वर पोहचली आहे.

18:14 (IST)17 May 2020
कोल्हापुरात ८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह, जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी शिवाय जिल्ह्यात प्रवेश बंद

करोनाचा संसर्ग कोल्हापूर जिल्ह्यात वेगाने पसरू लागला आहे. काल एकाचदिवशी ६ रुग्ण आढळले तर आज पुन्हा ८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबई परिसरातून येत असलेल्या रुग्णांना करोना बाधा होण्याचे प्रमाण वाढत असल्याने कोल्हापूरकर भीतीच्या छायेत आहेत.

17:52 (IST)17 May 2020
लॉकडाउन ४ संबंधी रात्री ९ वाजता कॅबिनेट सचिव करणार चर्चा

लॉकडाउन ४ च्या नियमावलीसंबंधी कॅबिनेट सचिव रात्री ९ वाजता सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा करणार आहेत.

17:41 (IST)17 May 2020
उत्तर प्रदेशात मजुरांचा उद्रेक, सीमारेषेवर बॅरिकेट्स तोडत केला राज्यात प्रवेश

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अनधिकृतपणे चालत किंवा वाहनाच्या सहाय्याने राज्यात येणाऱ्या मजुरांना रोखण्याचा आदेश दिल्यानंतर सीमारेषेवर स्थलांतरित मजुरांचा उद्रेक पहायला मिळाला. उत्तर प्रदेश-मध्य प्रदेश सीमारेषेवरील रेवा जिल्ह्यातील चाकघाट परिसरात हजारोंच्या संख्येने मजूर उपस्थित होते. यावेळी संतप्त मजुरांनी पोलिसांचे बॅरिकेट्स तोडत राज्यात प्रवेश केला. मजूर इतक्या संख्येत असल्याने पोलीसदेखील त्यांच्यासमोर हतबल झाल्याचं पहायला मिळालं.(सविस्तर वृत्त)

17:25 (IST)17 May 2020
“रस्त्यावर बसून मजुरांशी गप्पा मारण्याची ही वेळ आहे का?”, निर्मला सीतारामन राहुल गांधींवर संतापल्या

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शनिवारी रस्त्याने चालत जाणाऱ्या मजुरांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला होता. दरम्यान यावरुन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संताप व्यक्त केला असून रस्त्यावर बसून मजुरांशी गप्पा मारण्याची ही वेळ आहे का? असा संतप्त सवाल केला आहे. रस्त्यावर बसून गप्पा मारण्यापेक्षा त्यांच्या सुटकेस, बाळाला हातात उचलून घेऊन चालत गप्पा मारायला हव्या होत्या असं सांगताना हे नाटक नाही का ? अशी विचारणाही त्यांनी केली. (सविस्तर वृत्त)

16:49 (IST)17 May 2020
बीएसएफचे आणखी 10 जवान करोना पॉझिटिव्ह

जगभरात थैमान घालणाऱ्या जीवघेण्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात अद्यापही वाढतच आहे. सर्व सामान्य जनतेबरोबरच प्रशासकीय यंत्रणेत कार्यरत असलेले पोलीस, डॉक्टर, परिचारीकांसह सीमेवर लढणारे जवान देखील करोनाच्या विळख्यात सापडल्याचे दिसत आहे.   मागील 24 तासांत बॉर्डर ऑफ सिक्युरिटी फोर्सचे (बीएसएफ) दहा जवान करोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

16:41 (IST)17 May 2020
करोनाचे नमूने नष्ट केल्याची चीनकडून कबुली, अमेरिकेचा दावा ठरला खरा

चीनने आपण करोनाचे नमूने नष्ट केल्याची कबुली दिली आहे. चीनने आपण अनधिकृत प्रयोगशाळांना करोनाचे नमूने नष्ट करण्याचा आदेश दिला होता अशी माहिती दिली आहे. पण यावेळी त्यांनी जैविक सुरक्षेच्या हेतून हे नमूने नष्ट करण्यात आल्याचा दावा केला आहे. महत्त्वाचं म्हणजे चीनने दिलेल्या या कबुलीमुळे अमेरिकेकडून करण्यात आलेला दावा खरा ठरला आहे. (सविस्तर वृत्त)

16:31 (IST)17 May 2020
तामिळनाडू सरकारचाही लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय

तामिळनाडू सरकारनेही लॉकडाउन ३१ मे पर्यंत वाढवला आहे. १२ जिल्ह्यांना या लॉकडाउनमधून दिलासा देण्यात आलेला नाही. वाहतूक, सार्वजनिक ठिकाणं, शाळा बंदच राहणार आहेत.

15:19 (IST)17 May 2020
"वानखेडे मैदान ताब्यात घेणार नाही", महापालिका आयुक्तांनी केलं स्पष्ट

क्वारंटाइन सेंटर उभारण्यासाठी वानखेडे स्टेडिअम ताब्यात घेतलं जाणार असल्याचं वृत्त चुकीचं असल्याची माहिती महापालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिली आहे. मुंबईतील कोणतंच मैदान ताब्यात घेतलं जाणार नसल्याचं ते म्हणाले आहेत. महत्त्वाचं म्हणजे महापौर किशोरी पेडणेकर यांनी वानखेडे स्टेडिअमला भेट देत मैदानाची पाहणी केली होती. सोबतच वानखेडे परिसरातील नागरिकांनी मैदानात क्वारंटाइन सेंटर उभारण्यास विरोध केला होता. त्यानंतर आता महापालिका आयुक्तांनी असा कोणताही विचार नसल्याचं सांगितलं आहे. (सविस्तर वृत्त)

13:40 (IST)17 May 2020
राज्य सरकारला सहकार्य करा - सतेज पाटील

गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, “केंद्राच्या नियमावलीची आपण वाट पाहत असून त्यानंतर आपली नियमावली जाहीर करणार आहोत. यावेळी दिलासा देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असणार आहे. प्रत्येक जिल्ह्याने आपली परिस्थिती पाहून निर्णय घेण्याची मुभा देण्याचा विचार आहे. प्रत्येकाला काळजी घेणं आवश्यक राहणार आहे. सर्वांनी राज्य सरकारला सहकार्य करावं अशी अपेक्षा असणार आहे”.

13:39 (IST)17 May 2020
महाराष्ट्रात ३१ मे पर्यंत लॉकडाउन कायम, ठाकरे सरकारचा निर्णय

राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आला आहे. लॉकडाउनचा तिसरा टप्पा आज म्हणजेच १७ मे रोजी संपत असून केंद्राने आधीच लॉकडाउन वाढवला जाणार असल्याची घोषणा केली आहे. राज्य सरकारने मात्र याबद्दल कोणतीही घोषणा केली नव्हती. आज अखेर राज्य सरकारकडून घोषणा करण्यात आली असून ३१ मे पर्यंत लॉकडाउन कायम ठेवण्यात आला आहे. राज्यात ३१ मे पर्यंत लॉकडाउन वाढवला जावा यावर महाविकासआघाडीच्या नेत्यांचं एकमत झालं होतं. महाविकास आघाडीच्या नेत्यांची गुरुवारी बैठक पार पडली. या बैठकीत सर्वांचं लॉकडाउन वाढवण्यात एकमत झालं होतं. (सविस्तर वृत्त)

13:15 (IST)17 May 2020
आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत एकूण पॅकेज 20,97,053 कोटी रुपये - अर्थमंत्री

आत्मनिर्भर भारत योजनेंतर्गत एकूण उत्तेजन पॅकेज २०,९७,०५३ कोटी रुपये आहे, अशी माहिती यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली. 

13:12 (IST)17 May 2020
कर्जाच्या काही भागाच्या गुंतवणूकीद्वारे रोजगार निर्मिती वाढवणार - सीतारामन

राज्यस्तरीय सुधारणांना प्रोत्साहन देण्यासाठी, कर्जाचा काही भाग गुंतवणूकीद्वारे रोजगार निर्मिती वाढविणे आणि शहरी विकास, आरोग्य आणि स्वच्छता यासारख्या विशिष्ट सुधारणांशी जोडला जाईल - सीतारमन 

12:43 (IST)17 May 2020
कर्जांना डिफॉल्ट प्रकारात समाविष्ट केल जाणार नाही - सीतारामन

करोनाच्या काळात घेतल्या गेलेल्या कर्जांना डिफॉल्ट प्रकारात समाविष्ट केल जाणार नाही, असेही यावेळी सीतारामन यांनी स्पष्ट केले.

12:39 (IST)17 May 2020
कॉर्पोरेट कारभारामध्ये मोठी सुधारणा केली गेली - सीतारामन

करोनाच्या काळात वेळेवर निर्णय घेऊन कंपनी अधिनियमातील विविध तरतुदींनुसार असलेलं कंपन्यांमधील अनुपालन ओझं कमी करण्यात आलं. त्यासाठी कंपनी बोर्डाच्या बैठकींना ऑनलाईन राहण्याची परवानगी देण्यात आली, अधिकारांचे मुद्दे डिजिटल पद्धतीने मांडण्यास मुभा दिली गेली. याद्वारे कॉर्पोरेट कारभारामध्ये मोठी सुधारणा केली गेली - सीतारामन 

12:33 (IST)17 May 2020
डिजिटल शिक्षणासाठी पंतप्रधान ई-विद्या कार्यक्रम सुरू करणार - सीतारामन

तंत्रज्ञानावर आधारित शिक्षणाकडे लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. त्याचबरोबर डिजिटल/ऑनलाइन शिक्षणासाठी मल्टीमोडमध्ये प्रवेश करण्यासाठी पंतप्रधान ई-विद्या कार्यक्रम त्वरित सुरू केला जाईल. टॉपच्या १०० विद्यापीठांना ३० मे २०२० पर्यंत स्वयंचलितपणे ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्याची परवानगी देण्यात येईल, असेही अर्थमंत्री म्हणाल्या.

12:24 (IST)17 May 2020
४४ टक्के थकीत रकमेची वसुली - सीतारामन

दिवाळखोरी आणि दिवाळखोरी संहिता स्थापन झाल्यापासून ४४ टक्के बुडीत रकमची वसुली करणे साध्य झाले आहे, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी दिली.

12:18 (IST)17 May 2020
मनरेगाद्वारे अतिरिक्त ४०,००० कोटी रुपयांचे वाटप करणार - सीतारामन

रोजगारास चालना देण्यासाठी आता मनरेगा अभियानाद्वारे अतिरिक्त ४०,००० कोटी रुपयांचे वाटप करण्यात येणार असल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

12:15 (IST)17 May 2020
आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रत्येकी ५० लाखांचं विमा संरक्षणं दिलं - सीतारामन

४,११३ कोटींपेक्षा जास्त रुपये राज्यांना जाहीर करण्यात आले आहेत. आरोग्य कर्मचार्‍यांसाठी प्रत्येकी ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण जाहीर करण्यात आले असून आरोग्य कर्मचारी, कामगारांच्या संरक्षणासाठी साथीच्या रोग अधिनियमात सुधारणा करण्यात आली : सीतारमन

12:13 (IST)17 May 2020
'इज ऑफ डुईंग बिझनेस'मधील सुधारणांसाठी सरकार मिशन मोडवर - सीतारामन

'इज ऑफ डुईंग बिझनेस'मधील सुधारणांसाठीच्या पुढच्या टप्प्यासाठी सरकार मिशन मोडवर काम करीत असल्याचे यावेळी अर्थमंत्री सीतारामन यांनी सांगितलं. 

11:45 (IST)17 May 2020
राज्यांना मदतीसाठी १५,००० कोटी रुपये जाहीर केले - सीतारामन

सरकारने करोनाच्या नियंत्रणासाठी अनेक आरोग्यविषयक पावले उचलली आहेत. राज्यांना मदतीसाठी १५,००० कोटी रुपये जाहीर केले, गरजेच्या वस्तू टेस्टिंग लॅब, किट्, टेलिकन्सल्टेशन सेवा, आरोग्य सेतू अॅप, आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किटचा पुरवठा केला गेला - सीतारामन

11:43 (IST)17 May 2020
विद्यार्थ्यांसाठी १२ टीव्ही चॅनेल तयार करणार -सीतारामन

"विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन वर्गासाठी टीव्ही १२ नवे चॅनेल सुरू करण्यात आले आहेत. ई-पाठशाळा अंतर्गत २०९ नव्या पुस्तकांचा समावेश करण्यात आला आहे," अशी माहिती निर्मला सीतारामन यांनी दिली. 

11:40 (IST)17 May 2020
राज्यातील मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी केंद्राने ८५ टक्के खर्च उचलला - सीतारामन

जेव्हा सरकारने लॉकडाउन शिथील केला त्यामुळे कामगारांना घरी जाणे शक्य झाले तेव्हा श्रमिक विशेष गाड्या सुरू करण्यात आल्या. राज्यांना कामगारांना स्थानकांवर आणण्याची विनंती करण्यात आली. यासाठी केंद्र सरकारने ८५ टक्के खर्च उचलला : सीतारमन

11:37 (IST)17 May 2020
जन धन खाते असलेल्या महिलांना १०,०२ कोटी रुपये मिळाले - सीतारामन

२० कोटी जन धन खाते असलेल्या महिलांना १०,०२ कोटी रुपये मिळाले. २.२ कोटी बांधकाम कामगारांना ३,९५० कोटी रुपये मिळाले. ६.८१ कोटी लोकांना एलपीजी सिलिंडर मोफत मिळाले आणि १२ लाख ईपीएफओ धारकांना आगाऊ रक्कम काढली : सीतारमन

11:37 (IST)17 May 2020
१६,३९४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर केले - सीतारामन

एकाच वेळी 2,000 रुपये 8.19 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात ट्रान्सफर केले गेले. ही एकूण रक्कम 16,394 कोटी रुपये आहे. एनएसएपीच्या लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यात 1,405 कोटी रुपये आणि दुसऱ्या हप्त्यात 1,402 कोटी रुपये देण्यात आले. जवळपास 3,000 कोटी रुपयांचे उद्दिष्ट गाठण्यात सरकारला यश आले : सीतारमन 

11:33 (IST)17 May 2020
पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजद्वारे लोकांना थेट लाभ दिला - सीतारामन

पंतप्रधान गरीब कल्याण पॅकेजद्वारे लोकांना थेट लाभ हस्तांतरित करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला. गेल्या काही वर्षांत घेतलेल्या पुढाकारांमुळे आम्ही जे काही केले ते आम्ही करु शकलो : सीतारमन 

11:31 (IST)17 May 2020
अडचणीच्या काळात 3 महिने अगोदर नागरिकांना डाळींचा पुरवठा केला गेला - सीतारामन

लॉकडाउनमध्ये अडचणीच्या काळात डाळी 3 महिने अगोदर नागरिकांना दिल्या गेल्या. भारतीय खाद्य महामंडळ, भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ आणि राज्ये यांच्या प्रयत्नांचे मला कौतुक वाटते. वाहतुकीची अडचण असतानाही या आव्हानांचा सामना करीत डाळी व धान्य मोठ्या प्रमाणात दिले गेले : अर्थमंत्री निर्मला सीतारमण

10:58 (IST)17 May 2020
२५०० मजुरांचा रास्ता रोको; विशेष रेल्वे सोडण्याची मागणी

घरी जाण्यासाठी विशेष रेल्वे सोडण्यात यावी, या मागणीसाठी २५०० मजुरांनी रास्ता रोको सुरू केला आहे. उत्तर प्रदेशातील सहरानपूर येथे सहरानपूर अंबाला महामार्गावर हे मजूर बसले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या वतीनं या मजुरांना बिहारच्या सीमेपर्यंत सोडण्याची व्यवस्था केली जाणार आहे.

10:44 (IST)17 May 2020
Lockdown: विदर्भातील जिल्ह्यांमध्ये मिठाचा तुटवडा नाही; जिल्ह्याधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली व गोंदिया या तीन जिल्ह्यात मिठाचा तुटवडा असल्याची मोठी अफवा पसरली होती. त्यामुळे किराणा दुकानात मिठासाठी लोकांनी गर्दी केली. परंतू, मिठाचा तुटवडा नाही, ही अफवा असल्याचे तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ही अफवा पासरविणाऱ्यांवर कारवाईचा इशाराही दिला आहे. सविस्तर वृत्त वाचा

10:24 (IST)17 May 2020
दोन लाख ३९ हजार मजुर पोहोचले घरी

राज्यांच्या विनंतीनंतर केंद्र सरकारनं दिलेल्या परवानगीनुसार रेल्वे मंत्रालयानं मजुरांसाठी विशेष श्रमिक गाड्या सुरू केल्या आहेत. शनिवारी (१६ मे) या १६७ श्रमिक रेल्वेगाड्यामधून दोन लाख ३९ हजार मजुर आपल्या घरी पोहोचले आहेत.

10:19 (IST)17 May 2020
विशेष श्रमिक रेल्वेगाड्यांनंतरही मजुरांची पायपीट सुरूच

देशातील लॉकडाउन कायम ठेवत असताना सरकारनं ठिकठिकाणी अडकलेल्या आणि घरी निघालेल्या मजुरांसाठी विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडल्या. मात्र, या गाड्यानंतरही मजुरांची पायपीट सुरूच आहे. महामार्गांच्या कडेनं मजुरांचे लोंढे सुरूच आहे. पंजाबमधील लुधियानावरून उत्तर प्रदेश आणि बिहारमधील आपल्या घरी निघालेले मजुर.

10:13 (IST)17 May 2020
सोलापुरात आढळले आणखी १४ करोनाबाधित रूग्ण

सोलापुरात आणखी १४ करोनाबाधित रूग्ण सापडले. त्यामुळे एकूण रूग्णसंख्या ३७८ झाली आहे. आज आढळलेल्या रूग्णांमध्ये सात पुरूष आणि सात महिला आहेत. आतापर्यंत २४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर १५० रूग्णांनी करोनावर मात केली आहे.

10:05 (IST)17 May 2020
करोनावरील आठ लसींची वैद्यकीय चाचणी सुरु; जागतिक आरोग्य संघटनेची माहिती

नोवल करोना विषाणूमुळे अवघं जग सध्या संकटात सापडलं आहे. जगातील प्रत्येक देश या आजारापासून मुक्ती मिळवण्यासाठी युद्धपातळीवर वेगाने संशोधनात गुंतला आहे. मात्र, या विषाणूला नष्ट करण्यासाठी अद्याप कोणत्याही स्वरुपाचं यश मिळू शकलेलं नाही. सध्या करोनावरील महत्वाच्या ८ लसींची वैद्यकीय चाचणी घेतली जात आहे. सविस्तर वृत्त वाचा

10:02 (IST)17 May 2020
करोनाविरोधातील लढ्यात सर्वच धर्मगुरुंची भूमिका महत्त्वाची – संयुक्त राष्ट्र

करोना महामारीविरोधातील अनेक आव्हानांचा सामना करण्यात जगभरातील धर्मिक नेत्यांची भूमिका महत्वाची ठरू शकते, असे मत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस एंटोनियो गुटेरेस यांनी व्यक्त केले आहे.सविस्तर वृत्त वाचा

09:23 (IST)17 May 2020
मुंबई पोलीस दलाला आणखी धक्का

मुंबई पोलीस दलातील दोन अधिकाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाला. शाहूनगर पोलीस ठाण्यातील ३२ वर्षीय साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि मोटार परिवहन विभागातील साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक हे दोन अधिकारी शनिवारी करोनाचे बळी ठरले. पोलीस दलातील बळींचा आकडा वाढत असतानाच आता एका तरुण अधिकाऱ्याच्या मृत्यूने पोलीस दल हादरले आहे. मुंबई पोलीस दलात आत्तापर्यंत करोनामुळे आठ मृत्यू झाले आहेत.

09:22 (IST)17 May 2020
बरे झालेल्या रुग्णांचं प्रमाण ३५.०८ टक्के

देशात करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ५३,०३५ असून, ३० हजार १५२ रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. बरे झालेल्यांचे प्रमाण सुमारे ३५.०८ टक्के आहे. करोनाग्रस्तांच्या आकडय़ात विदेशी नागरिकांचाही समावेश आहे, असे मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग Coronavirus
Next Stories
1 करोनाविरोधातील लढ्यात सर्वच धर्मगुरुंची भूमिका महत्त्वाची – संयुक्त राष्ट्र
2 देशातील करोनाग्रस्तांची संख्या ९० हजारांच्या पुढे, गाव-खेड्यातही संसर्ग
3 खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन
Just Now!
X