सावंतवाडी : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कणकवली येथे उपरस्त्यांच्या झालेल्या दुर्दशेवरून गुरुवारी राष्ट्रीय महामार्ग  प्राधिकरणाचे उपअभियंता प्रकाश शेंडेकर यांच्यावर चिखल ओतून त्यांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी काँग्रेस आमदार नितेश राणे आणि त्यांच्या १६ समर्थकांना अटक झाली आहे. त्यांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

भाजपचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांचा पुत्र आमदार आकाश याने इंदूर येथे एका महापालिका अधिकाऱ्याला क्रिकेटच्या बॅटने मारहाण केली होती. त्यानंतर, कोणाचीही मनमानी खपवून घेणार नाही, असा सज्जड दम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भरला होता. मात्र या इशाऱ्याला दोन दिवस उलटत नाहीत तोच भाजपचे राज्यसभा सदस्य असलेले नारायण राणे यांच्या पुत्राने ही चिखलफेक केल्याने भाजपमध्येही खळबळ उडाली आहे. नारायण राणे यांनी तातडीने या घटनेबद्दल अधिकाऱ्याची जाहीर माफी मागितली.

कणकवली येथे मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण सुरू आहे. मात्र या चौपदरीकरणाने महामार्गालगतच्या उपरस्त्यांवर चिखल साचला आहे. रस्त्यांवर खड्डेही पडले आहेत. तेव्हा प्रथम उपरस्त्यांची कामे न करता महामार्ग चौपदरीकरण सुरू असल्याबद्दल जाब विचारायला नितेश राणे आले होते.

त्यांच्याबरोबर नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच ‘स्वाभिमान’ संघटनेचे कार्यकर्तेही होते. त्यांनी शेंडेकर यांना जाब विचारला तसेच त्यांना चिखल भरलेल्या रस्त्यावरून चालण्यास भाग पाडले. तसेच नागरिकांना चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून जाणे भाग पडत आहे, असे सांगत ‘हा चिखल कसा असतो, माहीत आहे का,’ असे विचारत त्यांना घोडनदी पुलाच्या कठडय़ाला बांधून त्यांच्यावर चिखलाने भरलेल्या बादल्या ओतल्या. त्यानंतर त्याच अवस्थेत त्यांना काही घरांजवळ नेले आणि तिथे साचलेले पाणी दाखवत प्रश्नांची सरबत्ती केली. यावेळी शेंडेकर यांना धक्काबुक्कीही झाली.

‘मी आमदार म्हणून नाही, तर कणकवलीचा नागरिक म्हणून तुम्हाला जाब विचारत आहे. पहिल्यांदा पंधरा दिवसांत महामार्गालगतचे सर्व उपरस्ते चांगले बनवा नाहीतर ठेकेदाराच्या मशिन्स फोडून टाकीन,’ असा इशाराही राणे यांनी दिला.  आमच्यावर गुन्हे नोंदवा. आम्ही जनतेसाठी लढत आहोत, असेही त्यांनी शेंडेकर यांना सांगितले. यादरम्यान पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर शेडेकर यांच्याशी चर्चा करण्यात आली. पण शेंडेकर हे सावंतवाडीच्या दिशेने रवाना झाले. त्यानंतर राणे यांच्याविरोधात त्यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर ही तक्रार कणकवली पोलीस ठाण्यात वर्ग झाली असून नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह कार्यकर्त्यांची धरपकड सुरू झाली.

आमची भूमिका
अपात्रताच हवी !

नितेश राणे यांचे एकंदर कर्तृत्व काय आणि त्यांचा वकूब काय याचे दिव्यदर्शन या महाराष्ट्रास अद्याप व्हायचे आहे. म्हणजे ते काय भले करू शकतात, हे या राज्यास कळायचे आहे. पण त्याआधी, जे करू नये तेच आपण कसे करू शकतो, हे दाखवण्यातच त्यांना अधिक रस असावा असे त्यांचे राजकीय वर्तन आहे. उद्दाम आणि बेमुर्वतखोर. गुरुवारी त्यांनी जे काही केले तो त्याचाच पुढचा भाग. ते हे जे काही करू शकतात ते कशाच्या आणि कोणाच्या जोरावर हे उघड आहे. पत्रकारास मारहाण करणारे शेकापचे आमदार जयंत पाटील आणि सरकारी अधिकाऱ्यावर चिखल ओतणारे नितेश राणे हे एकाच माळेचे मणी. राणे यांना अटक तरी झाली. पण हे प्रकार टाळायचे असतील तर अशा लोकप्रतिनिधींना अपात्र ठरवणे हाच उपाय आहे.