महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा राज्याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. राज्याचा निकाल ९५. ३० टक्के लागला आहे. यंदा दहावीच्या निकालात राज्यात कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक ९८.७७ टक्के लागला, तर औरंगाबाद विभागाचा निकाल सर्वात कमी ९२ टक्के आहे.

दुपारी एक वाजल्यापासून विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पाहता येणार आहे. यंदा देखील दहावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९६.९१ टक्के लागला तर मुलांचा निकाल ९३.९० टक्के लागला आहे. मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत ३.१ टक्क्यांनी अधिक आहे.

राज्यातील नऊ विभागांची निकालीच टक्केवारी –
पुणे- ९७.३४ टक्के, नागपूर – ९३.८४ टक्के, औरंगाबाद – ९२ टक्के, मुंबई ९६.७२ टक्के, कोल्हापूर – ९७.६४ टक्के, अमरावती – ९५.१४ टक्के, नाशिक -९२.१६ टक्के, लातूर -९३.९ टक्के व कोकण सर्वाधिक – ९८.७७ टक्के अशाप्रकारे राज्याचा एकूण निकाल ९५. ३० टक्के लागला आहे.

यंदाच्या दहावीच्या परीक्षेत प्रविष्ट झालेल्या नियमीत विद्यार्थ्यांची एकूण संख्या १५ लाख ७५ हजार १०३ होती . यामध्ये मुलींची संख्या ७ लाख ३४ हजार ४९१ व मुलांची संख्या ८ लाख ४० हजार ६१२. या पैकी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या १५ लाख १ हजार १०५ आहे.

यंदा मागील वर्षीच्या तुलनेत १८.२० टक्के जास्त निकाल लागला आहे. तर, ८ हजार ३६० शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच, ६० विषयांपैकी २० विषयांचा निकाल १०० टक्के लागला आहे.

यंदा पुर्नपरिक्षार्थींचा (रिपीटर) निकाल देखील चांगला लागल असून, यंदा या १ लाख ७९ हजार २६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्या पैकी १ लाख ३५ हजार ९९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले व त्यांच्या निकालीची टक्केवारी ७५.८६ टक्के आहे. तर, एकूण दिव्यांगाचा निकाल ९२. ७३ टक्के आहे.