शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लेटरबॉम्ब नंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून पुन्हा भाजपशी जुळवून घेण्याची विनंती केली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी शिवसेना कमकुवत करत असल्याचा दावा त्यांनी पत्रात केला होता. त्यावर महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी सरनाईक यांच्या सावध भूमिका घेत प्रतिक्रिया दिल्या आहेत. मोदी सरकार तपास यंत्रणांचा खुलेआम वापर करून महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली आहे.

सचिन सावंत यानी ट्विट करत भाजपावर टीका केली आहे. “आमदार प्रताप सरनाईकांबद्दल आम्हाला सहानुभूती आहे. त्यांच्या पत्रातून त्यांचा मानसिक छळ होत आहे हे लक्षात येते. मोदी सरकार तपास यंत्रणांचा खुलेआम वापर करून मविआ सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. येनकेन प्रकारे सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजपा अत्यंत खालच्या पातळीवर उतरली आहे” असे सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

“संबंध अजून तुटण्याआधी भाजपाशी जुळवून घ्यावं”, शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचं उद्धव ठाकरेंना पत्र!

सचिन सावंत यांनी आपल्या ट्विटमध्ये प्रताप सरनाईक यांच्या पत्रातील एका भागाचा फोटो ट्विटसोबत जोडला आहे. यामध्ये “कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून आम्हाला नाहक त्रास सुरु आहे. केंद्रीय तपास यंत्रणेचा दलाल व शिवसेनेमुळे “माजी खासदार” झालेल्या नेत्याकडून जी बदनामी सुरु आहे त्यालाही कुठे तरी आळा बसेल. आम्हाला टार्गेट करीत असताना आमच्या कुटुंबियांवर सुद्धा सतत आघात होत आहेत. खोटे आरोप होत आहेत. एका केसमधून जामीन मिळाला की तात्काळ जाणीवपूर्वक दुसऱ्या केसमध्ये गुंतवणे, त्यातून बाहेर आलो की तिसऱ्या केसमध्ये गुंतवणे अशा प्रकारचे जाणीवपूर्वक काम या तपास यंत्रणा करीत आहेत. आपल्या एका निर्णयामुळे हे कुठेतरी थांबेल” असे सरनाईक यांनी म्हटले होते.

प्रताप सरनाईक जेलचे पाहुणे होणारच; सरनाईकांच्या ‘लेटरबॉम्ब’नंतर सोमय्यांचा इशारा

दरम्यान, या पत्रावरुन भाजपा नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे. हे पत्र त्यांनी त्यांच्या प्रमुखांना लिहीलं आहे. त्यांना काय सांगायचे ते सांगितलं आहे. भाजपाचं एक पक्क आहे. येत्या काळामध्ये आम्ही बहुमताने निवडून येऊ”, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपा युती होऊ शकते असे विधान भाजपाचे खासदार गिरीश बापट यांनी केले आहे.