माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी राजकारणात विविध पदे भूषवली. ते शांततेचेच नव्हे तर शस्त्रपूजकही होते. याचा प्रत्यत त्यांनी पोखरण अणुचाचणीद्वारे जगाला करुन दिला, असे विधान केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी केले.

चंद्रपूरमध्ये शुक्रवारी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृहात अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. सर्वपक्षीय नेते याप्रसंगी उपस्थित होते. हंसराज अहिर म्हणाले, अटल बिहारी वाजपेयी या राष्ट्रहिताला प्राधान्य देणाऱ्या महान योद्ध्याने राजकारणात विविध पदे भूषवली. अटल बिहारी वाजपेयी हे शस्त्रपूजक होते. पोखरण येथील अणुचाचणी ही शस्त्रपूजाच होती. यातून अटलजींचा स्वाभिमान आणि राष्ट्राभिमान जगाला दिसला. वाजपेयींनी आपल्या कर्तुत्वाने पदाची शोभा वाढवली. इतके महानत्व अटलजींमध्ये होते, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, शुक्रवारी अहिर यांनी जिल्हा रुग्णालयात बैठकही घेतली. या बैठकीत त्यांनी डेंग्यू आजारग्रस्त तसेच संसर्गजन्य रूग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या आजारांवर तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करा, असे निर्देश दिले.