उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जत जामखेडमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलताना सर्कल अधिकाऱ्यांना दम भरला आहे. सर्कल अधिकाऱ्यांना सांगतो माझी सटकली तर तुझी वाट लागेल, अशा शब्दात अजित पवारांनी सज्ज दम दिला. अजित पवार यांनी यावेळी नवा रस्ता बांधून झाल्यावर जर एका पावसात रस्ते खराब झाले, तर त्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्यात येईल असं स्पष्ट सांगितलं. तसंच कोणता अधिकारी चिरीमिरी मागत असेल तर त्याचे नाव मला सांगा, मी बघतो त्यांच्याकडे, अशी तंबीही अजित पवारांनी दिली.

महिलांवरील अत्याचारासंदर्भात कडक कायदा आणला जात असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं. तक्रार आल्यास पोलिसांनी कारवाई करावी असं सांगताना अजित पवार यांनी हे सरकार कोणाच्या दडपशाहीने चालणार नाही. कोणताही राजकीय हस्तक्षेप होणार नाही असं आश्वासन दिलं. “महिलांसाठी असा कडक कायदा आणणार आहोत ज्यामुळे आपल्या माता-भगिनींकडे वाईट नजरेने पाहण्याची कोणाची हिंमत होणार नाही,” असंही यावेळी ते म्हणाले.

“ज्या मताधिक्याने तुम्ही आमच्या रोहितला निवडून दिलं त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. आता यापुढे सर्व जबाबदारी आमची. आम्ही फक्त बोलत नाही तर करून दाखवतो हे सर्वांना माहिती. मी तुमच्या आणि रोहितच्या पाठीशी आहे. कर्जत जामखेड हा माझा आवडता मतदारसंघ आहे, या तालुक्यांशी माझे भावनिक नाते आहे.१२ पैकी ९ जागा निवडून दिल्या बद्दल मी अहमदनगर जिल्ह्यातील सर्व मतदारांचे आभार. तुमचं नाणं खणखणीत आहे ते आम्ही वाजवणारच,” असंही यावेळी अजित पवार म्हणाले.

आणखी वाचा- आई, बहिणीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत नाही झाली पाहिजे – अजित पवार

अजित पवारांनी यावेळी सीएए, एनसीआर, एनपीआर संबंधी बोलताना या कायद्याचा महाराष्ट्रातील एकाही नागरिकाला त्रास होऊ देणार नाही असं आश्वासन दिलं. “कोणाच्या सागंण्यावर जाऊ नका, कोणत्याही नागरिकाला त्रास होणार नाही. आम्ही जोपर्यंत सरकारमध्ये आहे तोपर्यंत तुमच्या केसाला धक्का लागणार नाही असा शब्द मी देतो,” असं अजित पवार म्हणाले आहेत.