माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या जलयुक्त शिवार या महत्त्वाकांक्षी योजनेतील गैरकारभाराबाबत ‘कॅग’ने ताशेरे ओढल्यानंतर आता या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी घेतला. देवेंद्र फडणवीस यांना हा मोठा धक्का मानला जातो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून सूडबुद्दीने किंवा मुद्दामून कोण कऱणार आहे? अशी विचारणा केली आहे. पुण्यात अजित पवारांच्या हस्ते रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

अजित पवार यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरुन होणाऱ्या आरोपांना उत्तर देत म्हटलं की, “हे जाणुनबुजून करत नाही. कॅगच्या अहवाल दोन दिवसांच्या अधिवेशनात सादर करण्यात आला होता. कॅगच्या अहवालावर कॅबिनेटमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले. तशा पद्धतीच्या सूचना गेल्या आहेत”.

“सूडबुद्दीने किंवा मुद्दामून कोण कऱणार आहे? कॅगचा अहवाल कोणाच्या काळात आला? कारण नसताना राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. आम्ही विरोधी पक्षात असताना देवेंद्र फडणवीसांचं सरकार होतं तेव्हा जलसंधारण खातं ज्यांच्याकडे होतं त्या तानाजी सावंत यांनी विधानपरिषेदत भ्रष्टाचार झाल्याचं सांगितलं होतं….त्यांनीच तसंच सूतोवाच केलं होतं,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

अतिवृष्टीचा फटका बसलेल्या भागाला राज्य सरकार मार्फत सर्वतोपरी मदत करणार
“राज्यातील अनेक भागाला अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर फटका बसला असून संबधित भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. या संकटाच्या काळात राज्य सरकारमार्फत पावसामुळे झालेल्या नुकसान भागात, राज्य सरकारमार्फत सर्वतोपरी मदत करणार,” असल्याचं अजित पवार यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले की, “जोरदार पावसामुळे सोलापूर, पंढरपूर, सांगली यासह राज्यातील अनेक भागाला मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. त्यामध्ये विशेषतः शेतकर्‍यांचे हाताला आलेले पीक वाया गेलं आहे. त्यामुळे अगोदरच करोना आणि अतिवृष्टीमुळे शेतकरी संकटात सापडला असून त्या पार्श्वभूमीवर प्रशासनाला पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. त्याचबरोबर ज्या भागात नागरिक अडकले आहेत त्यांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. ज्या भागांचं नुकसान झालं आहे. तेथील नागरिकांच्या पाठीशी राज्य सरकार आहे. काही महिन्यापुर्वी कोकण भागात झालेल्या नुकसान परिसराची पाहणी केंद्रीय पथकाने तात्काळ केली. त्यानुसार आता या भागाची देखील करावी आणि केंद्राकडून लवकरात लवकर मदत द्यावी,” अशी मागणी देखील यावेळी त्यांनी केली. हवामान विभागाने अंदाज वर्तवल्यापेक्षा अधिक पाऊस झाला असल्याचे त्यांनी सांगितले.