विधान परिषद : यवतमाळ स्थानिक स्वराज्य निवडणूक

विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी माजी खासदार विजय दर्डा यांनी काँग्रेस श्रेष्ठींच्या बठकीत हजर राहून दाखवल्याच्या वृत्ताने राष्ट्रवादीत प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. ही जागा सध्या राष्ट्रवादीकडे असून संदीप बाजोरिया आमदार आहेत. राष्ट्रवादी कांॅग्रेसने पुन्हा बाजोरिया यांची उमेदवारी जाहीर केलेली असतांनाच आघाडीतील काँग्रेसने यावेळी मात्र ही जागा काँग्रेस लढणारच, असा पवित्रा घेतल्याने  काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत बिघाडी होण्याचे चित्र आहे.

राज्यात शिक्षक मतदारसंघाच्या २, पदवीधर मतदारसंघाच्या ३ आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ६, अशा ११ मतदारसंघात येत्या नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेसची भूमिका ठरवण्यासाठी शुक्रवारी मुंबईत प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विधान परिषद उपसभापती माणिकराव ठाकरे, आमदार हरिभाऊ राठोड, शिवाजीराव मोघे, प्रा. वसंत पुरके, संजय देशमुख हे माजी मंत्री, माजी आमदार वामनराव कासावार, माजी आमदार विजय खडसे यांच्यासह माजी सभापती देवानंद पवार, वजाहत मिर्झा आदी नेते हजर होते. या बठकीला माजी खासदार विजय दर्डा हजर असल्याने आणि त्यांनी विधान परिषद निवडणूक काँग्रेसने लढली पाहिजे, अशी भूमिका घेतल्याने कमालीच्या चच्रेला ऊत आला आहे. स्वत विजय दर्डा किंवा त्यांचे पुत्र देवेंद्र दर्डा ही निवडणूक लढण्यास उत्सुक असल्याचे समजते.

ही निवडणूक घोडाबाजारची निवडणूक असल्याने क्रयशक्ती असलेला उमेदवारच कॉंग्रेसजवळ नाही म्हणून काँग्रेसने ही निवडणूक लढू नये, असा एक विचार प्रवाह काँग्रेसमध्ये आहे. मात्र, निवडणूक लढल्यास आणि अश्वखरेदीची ताकद असलेल्या सात उत्सुकांनी पक्षश्रेष्ठींसमोर मुलाखती दिल्याने राष्ट्रवादीत प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे. या मतदारसंघात स्वबळावर निवडून येण्याइतपत, तसेच बहुमत एकाही राजकीय पक्षाजवळ नाही. मात्र, काँग्रेसचे संख्याबळ पहिल्या क्रमांकावर आहे, तर राष्ट्रवादीचे दुसऱ्या क्रमांकावर आहे. गेल्या खेपेला संख्याबळ जास्त असूनही काँग्रेसने राष्ट्रवादीच्या संदीप बाजोरिया यांना पाठिंबा दिला होता. यावेळी मात्र पाठिंबा न देता स्वत कांॅग्रेसने उमेदवार उभा करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्या दृष्टीनेच मुंबईत काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची दुपारी  बठक झाली. त्यानंतर राष्ट्रवादीसोबत काँग्रेसने बठक घेतली. मात्र, यात यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेची जागा राष्ट्रवादी सोडणार नाही, हे या पक्षाच्या नेत्यांनी स्पष्ट शब्दात काँग्रेसला सांगितले. दुसरीकडे, कॉंग्रेसने सुध्दा लढलेच पाहिजे, अशी आक्रमक भूमिका विजय दर्डा, शिवाजीराव मोघे, वसंत पुरके, संजय देशमुख आदी नेत्यांनी घेतल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.

पदवीधरमध्ये काँग्रेस लढणार

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात काँग्रेस लढणारच, असा निर्णय झाल्याचे समजते. संजय खोडके आणि डॉ. अविनाश चौधरी हे दोन प्रबळ दावेदार असून खाडके यांचे नाव पहिल्या क्रमांकावर असल्याची चर्चा आहे. भाजप नेते गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याविरोधात लढणाऱ्या तगडय़ा उमेदवाराच्या शोधात कांॅग्रेस आहे. काँग्रेसचा कोणताही उमेदवार असो आपण लढण्याची जय्यत तयारी केली असून विजयाची शंभर टक्के खात्री असल्याचा विश्वास गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी व्यक्त केला आहे.