वारकरी संप्रदायातील महत्वाची मानली जाणारी चैत्र वारी रद्द करण्यात आली आहे.दि.४ एप्रिल रोजी या वारीचा मुख्य दिवस म्हणजेच चैत्र एकादशी आहे. सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे. दरम्यान, करोनामुळे शेकडो वर्षांची वारीची परंपरा प्रथमच खंडित झाली आहे.

“ भेटी लागे जीवा ..लागलीस आसा “ अशी आर्त विनवणी करीत भाविक सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरीत येत असतो. वारकरी संप्रदायात आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्र या चार वारींना अनन्यसाधारण महत्व आहे. यातील चैत्र वारीसाठी दरवर्षी राज्यासह कर्नाटक, आंध्रप्रदेश येथून भाविक पंढरीत येतात. जवळपास ३ ते ४ लाख भाविकांची चैत्र वारीनिमित्त पंढरीत मांदियाळी जमत असते.

मात्र, सध्या देशात करोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. त्यात जनसंपर्कातून या विषाणूचा प्रादुर्भाव अधिकच होत असल्याने हे टाळण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी १४ एप्रिल पर्यंत लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तर राज्य सरकारने देखील जिल्हा बंदीचा आदेश आहेत. या सर्व बाबींचा विचार करता भाविकांनी पंढरीत वारीसाठी येऊ नये म्हणून चैत्र वारी रद्द करण्याचा निर्णय मंदिर समितीने घेतला आहे. या आधी येथील महाराज मंडळीनी भाविकांनी वारीसाठी पंढरीत येऊ नये असे आवाहन केले होते.

मंदिर समितीने दि.१७ मार्च ते ३१ मार्च अखेर श्री विठ्ठल –रुक्मिणीमातेचे दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तो वाढवून आता १४ एप्रिल पर्यंत मंदिर दर्शनासाठी बंद ठेवले आहे. मात्र देवाची नित्यपुजा सुरु राहणार असल्याची माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी दिली आहे.

दरम्यान, हा निर्णय घेण्यासाठी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प.गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी पुढाकार घेतला आहे. तर समितीचे सदस्य आमदार राम कदम , आमदार सुजितसिंह ठाकुर, नगराध्यक्षा साधना भोसले, संभाजी शिंदे, शंकुतला नडगिरे,  ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, प्रकाश महाराज जवंजाळ, भास्करगिरी महाराज, दिनेशकुमार कदम, माधवी निगडे, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड, आदींनी या निर्णयास सहमती दर्शवली आहे.