महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या पोलीस उपनिरीक्षकपदाच्या  रविवारी झालेल्या पूर्वपरीक्षेत गोंधळ निर्माण होऊन विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. आयोगाच्या परीक्षेतील गोंधळाचे सातत्य याहीवेळी दिसून आले. विद्यार्थ्यांना परीक्षेचा पेपर सोडवण्याऐवजी त्यांचे नाव शोधणे, फोटो चिटकवणे, क्रमांक बदलणे, अशी कामे ऐनवेळी करावी लागली.
आयोगाच्या संकेतस्थळावरील विद्यार्थ्यांची माहिती नष्ट झाल्याने ७ एप्रिलला होणारी हीच परीक्षा रविवारी  (१८ मे रोजी) घेण्याचे आयोगाचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी त्यावेळी जाहीर केले होते. विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा माहिती अद्ययावत करण्याची सूचना विद्यार्थ्यांना केली होती. त्या पाश्र्वभूमीवर   २६० जागांसाठी लाखो विद्यार्थ्यांची परीक्षा राज्यातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर घेण्याचे नियोजित होते. मात्र, परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला.
सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान झालेल्या १०० गुणांच्या ‘जनरल स्टडीज’चा पेपर होता. त्यांचे नाव, क्रमांक, छायाचित्रांची तपासणी करण्याच्या हेतूने त्यांना सकाळी १०.३० वाजता परीक्षा केंद्रावर बोलावले होते. अटेंडन्स सिटवर विद्यार्थ्यांचे नाव बरोबर होते, तर क्रमांक चुकलेला होता. क्रमांक बरोबर होता, तर नावच चुकलेले होते. नाव बरोबर होते, तर त्यासमोर चुकीचे छायाचित्र होते. मुलग्यांच्या नावासमोर मुलींचे फोटो होते. या सर्व गोंधळाची माहिती मुंबईला आयोगाच्या कार्यालयात देण्यात आल्यानंतर झालेल्या चुका निस्तरण्यासाठी विद्यार्थ्यांना ऐनवेळी हॉल तिकीट देऊन त्यांच्या परीक्षा ठरलेल्या वेळी घेण्याची सूचना करण्यात आली. त्यामुळे ज्यांच्याकडे ‘अ‍ॅड्रेस प्रूफ’ होते त्यांना परीक्षा सुरू व्हायच्या काही मिनिटाअगोदर हॉल तिकीट देण्यात आले. मात्र, विद्यार्थ्यांचा वेळ छायाचित्र चिटकवणे, नाव शोधणे, नाव बदलणे व क्रमांक शोधण्यातच गेला. दरवर्षी विद्यार्थ्यांच्या आवश्यक माहिती आणि छायाचित्रासह त्यांना छापील हॉल तिकीट दिले जाते. मात्र, यावेळी परीक्षेच्या काही मिनिटाआधी हाताने लिहिलेले हॉल तिकीट देण्यात आले.  
 रविवारी परीक्षा असताना शनिवारी रात्री उशिरापर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाईन हॉल तिकीट मिळू न शकल्याने परीक्षेला बसू शकणार नाही, या भीतीने काहींनी परीक्षा केंद्र गाठले. मात्र, त्या ठिकाणी या गोंधळाला तोंड द्यावे लागल्याने त्यांना बराच मनस्ताप सहन करावा लागला. नागपुरातील विज्ञान संस्था, धंतोलीतील सुळे हायस्कुल, मॉरिस कॉलेज इत्यादी केंद्रांवरील शेकडो विद्यार्थ्यांना हा त्रास सहन करावा लागला.