अलगीकरण कक्षात सुविधा नसल्यामुळे करोना चाचणीस टाळाटाळ; रुग्णसंख्या वाढण्याची भीती

पालघर : करोना संशयित रुग्णांना ठेवण्यात येणाऱ्या अलगीकरण कक्षामधील गैरसोयीमुळे ताप असलेल्या किंवा करोनाची लक्षणे दिसणाऱ्या अनेक संशयितांनी स्वत:ची तपासणी व चाचणी करून घेण्याऐवजी घरीच बसून राहण्यास पसंती दिल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे करोनाचा प्रादुर्भाव होऊन रुग्ण संख्या झपाटय़ाने वाढण्याची भीती व्यक्त होऊ  लागली आहे.

पालघर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. शाळा, बंद असलेल्या इमारतीचे अधिग्रहण करून त्या ठिकाणी अलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहेत. त्यामुळे अशा केंद्रांमध्ये पुरेशा प्रमाणात शौचालय-बाथरूम नसल्याने किंवा त्याची स्वच्छता नसणे,  पिण्याचे पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध न होणे, गरम पाणी पिण्यासाठी व आंघोळीसाठी  न मिळणे, चादरी नियमितपणे न बदलल्या जाणे, साफसफाई-स्वच्छता नसणे बाबतच्या तक्रारी पुढे येत आहेत.

परिणामी अनेक शहरी व ग्रामीण भागात ताप व करोनाची लक्षणे असताना देखील काही नागरिकांनी खाजगी डॉक्टरांकडून दूरध्वनीवरून संपर्क साधून औषधोपचार करून घेण्यास आरंभ केला आहे. तर इतर काही नागरिकांनी खाजगी संस्थांकडून करोनाची चाचणी करण्यास प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. काही अलगीकरण कक्षांमध्ये सुविधा चांगल्या दर्जाचे असल्याने तिकडे  पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र, आरोग्य विभागाने त्याचे खंडन केले आहे. सफाई कर्मचाऱ्यांची संख्या कमी असल्याने स्वच्छता राखण्यास अडचणी येत असल्याचे देखील सांगण्यात येते.  औद्योगिक शहरे व ग्रामीण भागातील काही गाव करोनासाठी अतिसंवेदनशील झाली आहेत. बोईसर येथील एका भागातून करोनाचे सोळा रुग्ण आढळल्याने त्या वसाहतीमधील सुमारे अडीचशे नागरिकांना वैद्यकीय तपासणी करावी लागली आहे.

रुग्णांची अवहेलना

जिल्ह्यात करोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. समाजाकडून अशा व्यक्तींना शहरी भागात तसेच ग्रामीण भागात देखील स्वीकारले जात नसल्याचे अनेक प्रकार पुढे आल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येते.   पालघर तालुक्यातील मासवण येथे  गावात प्रवेश नाकारला गेल्याने एका व्यक्तीला शेतावरील झोपडय़ात तर अन्य एका कुटुंबाला नाईलाजाने मुंबईकडे स्थलांतर करण्याची वेळ  आली आहे. समाजाने अशा व्यक्तींकडे माणुसकीच्या नजरेतून पहावे  असे आवाहन   करण्यात येत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचा कारवाईचा इशारा

जिल्ह्यातील अलगीकरण कक्षांमध्ये पाणी, स्वच्छता, अन्न, वीजपुरवठा या मूलभूत सुविधा उपलब्ध करून न दिल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी  दिला आहे. जिल्ह्यातील सर्व अलगीकरण कक्षाचा  आढावा घेण्यासाठी दूर चित्र संवाद आयोजित केली होती. यावेळी उपजिल्हाधिकारी किरण महाजन, तहसीलदार महसूल उज्वला भगत, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कांचन वानेरे आदी अधिकारी वर्ग उपस्थित होता.  सुविधांची तात्काळ सुधारणा करून घ्याव्या अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व प्रांत अधिकारी व तहसीलदार यांना दिल्या. तसेच कामात निष्काळजीपणा करीत असेल त्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी असे आदेश  जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी अधिकारी वर्गाला दिले. कक्षामधील व्यक्तींना सकाळी काढा पिण्यासाठी गरम पाणी देण्यात यावे, वेळेवर नाश्ता, जेवण उपलब्ध व्हावे, शौचालय व बाथरूमची नियमित साफसफाई करण्यात यावी, चादरी बदलण्यात याव्यात, मनोरंजनाची सुविधा असावी, सी.सी.टीव्ही कॅमेरा बसवण्यात यावेत, जनरेटर उपलब्ध करावे तसेच सर्व सुविधा सर्व केंद्रात असणे आवश्यक असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. तसेच अशा कक्षांजवळ डॉक्टरानीं राहावे यासाठी त्वरित पाठपुरावा करण्याचे त्यांनी सूचित केले. जिल्हा शल्य चिकित्सक यांनी आठवडय़ातुन दोनदा कक्षाला भेट देणे गरजेचे असून, प्रांत अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी आपापल्या भेटीचे वेळापत्रक ठरवण्याच्या सूचना देऊन स्वत: आठवडय़ातून एकदा कक्षाला भेट देऊन परिस्थिती जाणून  घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.