News Flash

आरोप-प्रत्यारोपांमुळे कोल्हापुरात युती घायाळ

लोकसभा निवडणुकीतील पराजयाच्या विश्लेषणावरुन सुरु झालेल्या आरोप प्रत्यारोपामुळे युतीच्या प्रतिमेला तडा गेला आहे. सेनेतील स्थानिक नेतृत्वाला गटबाजीचे खतपाणी घालण्याचे काम राज्यस्तरावरील गटनेते, संपर्क प्रमुख यांच्याकडूनच

| May 24, 2014 03:02 am

लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या झंझावाती प्रचाराने केंद्रात सत्ता काबीज केल्यावर आता राज्यातही भगवा फडकविण्याची संधी प्राप्त झाली असताना तिचे सोने करण्याऐवजी शिवसेनेतील दुफळीमुळे ‘दैव आले द्यायला, अन पदर नाही घ्यायला’ अशी कर्मदरिद्री अवस्था करवीरनगरीतील सेना नेतृत्वाकडे दिसत आहे. लोकसभा निवडणुकीतील पराजयाच्या विश्लेषणावरुन सुरु झालेल्या आरोप प्रत्यारोपामुळे युतीच्या प्रतिमेला तडा गेला आहे. शिवसेनेतील स्थानिक नेतृत्वाचा वाद मिटविण्यासाठी राज्यस्तरीय नेतृत्वाने धाव घेवून रंगसफेदी केली आहे. तथापि, सेनेतील स्थानिक नेतृत्वाला गटबाजीचे खतपाणी घालण्याचे काम राज्यस्तरावरील गटनेते, संपर्क प्रमुख यांच्याकडूनच होत असल्याचा दावा शिवसैनिकांतून केला जात आहे.
सेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची कोल्हापूरवर विशेष मर्जी होती. सेना प्रमुखांच्या विचाराने भारावलेल्या कोल्हापूरकरांनी आजवर शिवसेनेचे अर्धा डझन आमदार निवडून देऊन विश्वास सार्थ केला होता. एकीकडे शिवसेनेची ताकद वाढत असताना दुसरीकडे गटबाजीची लागणही पक्षाला झाली. रामभाऊ चव्हाण, विनायक साळुंखे या जिल्हाप्रमुखाच्या काळातही गटबाजी उफाळून आल्याने शिवसेनेच्या वाढीला मर्यादा आल्या होत्या. अलिकडेही शिवसेनेतील आमदार तथा शहरप्रमुख राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके आणि संजय पवार, विजय देवणे या जिल्हाप्रमुखातील वादाने उसळी घेतली आहे. पक्षाने एखादे आंदोलन घेण्यास सांगितले तर दोन्ही गटाची एकत्रित आंदोलन होण्याऐवजी वेगवेगळया ठिकाणी आंदोलने होतात. काही महिन्यापूर्वी पवार गटाने सेनेचे गटनेते आमदार दिवाकर रावते यांचा ज्या शब्दात उध्दार केला होता तो  शोभादायक नव्हता. तेव्हाही पक्षांतर्गत वाद मिटवला गेल्याचे शिवालयातून सांगितले गेले असले तरी त्यामध्ये वास्तवतेचा अभाव होता.
लोकसभा निवडणुकीतील अपयशावरुन क्षीरसागर, नरके आणि पवार, देवणे यांच्यातील वादाने डोके वर काढले. कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत भगवा फडकवणे हे सेनाप्रमुखांचे स्वप्न होते. सेनाप्रमुखांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांनी डिसेंबर २०१२ मध्ये कोल्हापूर दौरा केला. तेव्हा त्यांनी सेनाप्रमुखांच्या स्वप्नाची आठवण सांगून शिवसनिकांना आवाहन करताना ‘मी हिम्मत हरलेलो नाही, तुम्हीही हरु नका. आता रडायचे नाही, लढायचे’ अशी भावनिक हाक घातली होती. शिवबंधनात अडकलेल्या शिवसनिकांडून प्रामाणिकपणे प्रचार होऊन संजय मंडलिक संसदेत पोचतील असे आशादायी चित्रही होते. मात्र प्रचार काळात फंदफितुरीचे राजकारण होऊन सूर्याजी पिसाळ निपजले गेले. यावरुनच स्थानिक नेतृत्वात संघर्षांची ठिणगी पेटून आरोप-प्रत्यारोपांचा तोफखाना धडाडू लागला आहे. आरोपामधील आशयामध्ये वास्तवता खरीच आहे की त्याला शहर प्रमुखाचे राजकारणाची किनार जोडली गेली आहे याच्या खोलात सेना नेतृत्वाने जाण्याची गरज निर्माण झाली आहे. विरोधकांनी दिलेल्या पशाच्या गठ्ठयांचा  खरोखरच स्थानिक नेतृत्वाने स्वीकार केला आहे का, याचा तपास करण्याची वेळ आली आहे.
शिवसेनेच्या स्थानिक नेतृत्वामध्ये झुंज सुरु झाल्यावर सेना भवनातून निरीक्षकांना करवीर नगरीत धाडण्यात आले. खासदार अनिल देसाई, संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांनी वादामध्ये अडकलेल्या स्थानिक नेतृत्वाला एकत्रितपणे समोर बसवून पक्षशिस्त काय असते, याचा पाढा वाचून शिस्तीला बाधा आणल्यास नव्या नेतृत्वाकडे सूत्रे सोपविण्यात येतील असा दम भरला. त्यामुळेच की काय आता स्थानिक नेतृत्वाने जादा काही मिळविण्यापेक्षा आहे ते राखलेले बरे असा विचार केल्याचे दिसते. याचा अर्थ शिवसेनेतील वादाला मुठमाती मिळाली असे म्हणणे धाडसाचे ठरणार आहे. लोकसभेला पेरलेले विश्वासघाती राजकारण विधानसभेला उगवणार नाही याची शाश्वती काय, असा प्रश्न सामान्य शिवसनिक उपस्थित करीत आहेत. स्थानिक नेतृत्वातील सततच्या वादाचे खरे कारण म्हणजे शिवसेनेतील दोन्हीही गटाना सांभाळून घेणारे वरिष्ठ पातळीवरचे नेतृत्व होय. क्षीरसागर यांची पाठराखण दिवाकर रावते हे करतात आणि पवार, देवणे यांना पाठीशी घालण्याचे काम दुधवाडकर करतात, ही सामान्य शिवसनिकांची कुजबुज बरेचकाही सांगून जाते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 24, 2014 3:02 am

Web Title: problem in alliance due to recrimination 2
Next Stories
1 मनपात शेलार यांच्या निलंबनाचा ठराव
2 दानवेंच्या मंत्रिपदाची जालन्यात उत्सुकता
3 सोलापूर जिल्ह्य़ात राष्ट्रवादीसाठी धोक्याची घंटा
Just Now!
X