हर्षद कशाळकर

टाळेबंदीच्या काळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या व्यक्ती आणि वाहनांसाठी रायगड पोलीस अधीक्षक कार्यालयाने ई-पास प्रणाली विकसित केली होती. ही प्रणाली सुरुवातीला कोकण विभागात आणि नंतर संपूर्ण राज्यात वापरण्यात आली. या ई-पास प्रणालीचा जवळपास राज्यभरातील साडेपाच लाख लोकांना लाभ झाला आहे.

टाळेबंदीच्या पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवा सुरळीत ठेवणे हे प्रशासनासमोरील मोठे आव्हान होते. त्यामुळे स्थानिक प्रशासनाच्या माध्यमातून अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांना पास वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यात सुसूत्रता  आणि विश्वासार्हता राखणे आवश्यक होते. ही बाब लक्षात घेऊन रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी सायबर सेलच्या मदतीने एक वेब पोर्टल विकसित केले. यात क्यूआर कोड आधारित ई-पास देण्याची सुरुवात करण्यात आली. (https://covid19.mhpolice.in) मात्र या पोर्टलची उपयुक्तता लक्षात घेऊन कोकण विभागाचे पोलीस महानिरीक्षक निकेत कौशिक यांनी हे पोर्टल कोकण विभागात वापरण्याचा निर्णय घेतला. कोकणातील रायगड, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात हे पोर्टल वापरण्यात आले. यानंतर कायदा व सुव्यवस्था विभागाचे महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी राज्यभरात या ई-पास प्रणालीचा वापर करण्याचे निर्देश दिले. २४ मार्चपासून रायगड जिल्ह्य़ात सुरू केलेले हे पोर्टल २८ मार्चपासून राज्यभरात वापरले जाऊ लागले.

वेळ वाचला

राज्यभरात अडकून पडलेल्या नागरिकांसाठी याच वेबपोर्टलचा वापर केला जात आहे. राज्यभरातील साडेपाच लाखहून अधिक नागरिकांना ई-पास सेवेचा लाभ मिळाला आहे. पोर्टलची उपयुक्तता आणि कार्यक्षमताही यातून सिद्ध झाली आहे. ऑनलाइन पोर्टल सेवेमुळे ई-पास वितरण सेवेतील गतिमानता, सुसूत्रता आणि विश्वासार्हता वाढली आहे. अर्जदारांना अर्ज करणे, ऑनलाइन पद्धतीने ई-पास प्राप्त करणे शक्य झाले. पोलीस स्टेशन अथवा सरकारी कार्यालयांमध्ये फेऱ्या मारणे, तसेच गर्दी करण्याची वेळही आली नाही. प्रशासनाला ई-पास घेणाऱ्या व्यक्तीची माहिती संकलित ठेवणे सहज शक्य झाले. त्यामुळे आपत्कालीन काळासाठी रायगड पोलिसांनी विकसित केलेले अ‍ॅप अल्पावधीतच कमालीचे यशस्वी ठरले आहे.

सुरुवातीला पोलिसांमार्फत ही यंत्रणा राबविली जात होती. नंतर मात्र जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत ही यंत्रणा कार्यान्वयित ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर पोलिसांनी या वेब पोर्टलचे अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे हस्तांतरित केले. आज राज्यांतर्गत तसेच परराज्यात जाणाऱ्यांसाठीही याच पोर्टलचा वापर केला जात आहे. राज्यभरातील ९८ लाखहून अधिक लोकांनी आतापर्यंत या वेबपोर्टलला भेट दिली आहे. या वेबपोर्टलमुळे प्रशासनाचे कामही सुसह्य़ झाले आहे.

सुरुवातीला अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांच्या वाहतुकीसाठी आम्ही ई-पास सुविधा विकसित केली. नंतर अडकून पडलेल्या नागरिकांसाठी या पोर्टलचा वापर करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे कामात सुसूत्रता आणि गतिमानता आलीच. पण क्यूआर कोड प्रणालीमुळे विश्वासार्हताही वाढली.

–   अनिल पारस्कर, पोलीस अधीक्षक रायगड