लोकसभा निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागले असून यामधील सर्वात जास्त आश्चर्यकारक आणि अनपेक्षित निकाल म्हणजे राजू शेट्टींचा पराभव. शिवसेना उमेदवार धैर्यशील माने यांनी एक लाखाच्या मताधिक्याने राजू शेट्टींचा पराभव केला. पराभव धक्कादायक होता मात्र राजू शेट्टी यांनी खचून न जाता पुन्हा एकदा मैदानात उतरण्याचा इरादा कवितेच्या माध्यमातून त्यांनी स्पष्ट केला आहे. राजू शेट्टी यांनी आपली कविता फेसबुकवरही पोस्ट केली आहे.

‘आजपासून..’ या शीर्षकाच्या कवितेद्वारा शेट्टी यांनी लोकप्रतिनिधी नसलो तरी चळवळीला बांधील असल्याचे स्पष्ट केले आहे. शेतकरी चळवळीचे व्रत पुढे चालण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे. ‘ मी संत नाही शांत आहे ,गोतावळ्यातून दुरावलो ,याची मनात खंत आहे , अशा भावना त्यांनी कवितेच्या आरंभी व्यक्त केल्या आहेत. मी खचलो नाही, थोडासा टिचलो आहे ..ते कोण मला बेदखल करणार ? मी बळीराजाच्या काळजातच, घर करून बसलो आहे ..असे म्हणत त्यांनी शेतकऱ्यांशी आपला ऋणानुबंध दर्शवला आहे.

म्हणून चला .. भूमीपुत्रांनो उठा, नवा एल्गार करू.. ! गोरगरिबांच्या हक्कासाठी आजपासून संघर्षाचा नवा अध्याय सुरू…!! असा आशावाद व्यक्त करून त्यांनी आपली लढाई सुरूच असल्याचे अधोरेखित केले आहे.

राजू शेट्टींनी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं तरीही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. राज्य़ आणि देश पातळीवर आंदोलन करताना त्यांचा मतदारसंघातील संपर्क कमी झाला याचाच फटका त्यांना बसला. याशिवाय जैन विरुद्ध मराठा असा संघर्षही परिणाम करणारा ठरला.

राजू शेट्टींचा राजकीय प्रवास – 
कोल्हापूर जिल्ह्य़ातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघ यंदा राजू शेट्टी यांच्यामुळे चर्चेत होता. सत्तेत असूनही ऊस, दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी दिलेला लढा ही शेट्टी यांची जमेची बाजू होती. ऊस, दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रश्न हिरिरीने चव्हाटय़ावर आणण्यात शेट्टी यशस्वी ठरले, त्याआधारे त्यांनी जिल्हा परिषद ते लोकसभा असा राजकीय प्रवासही केला. लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीत त्यांनी डावे, समाजवादी पक्षांची साथ मिळवून दोनदा खासदार झालेल्या राष्ट्रवादीच्या निवेदिता माने यांना पराभूत केले. तर, गेल्या वेळी भाजप-शिवसेना महायुतीतून काँग्रेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांना पराभूत केले होते.