News Flash

रेमडेसिविरचा तुटवडा कायम

बोईसर भागात काहींनी तर आपली दुकानेच थाटली असून विना देयक ही इंजेक्शन आणून दिली जात आहेत.

पाच हजार रुपयांना एक इंजेक्शन ; खासगी करोना रुग्णालयांना पुरवठा नाही

पालघर : शासकीय करोना रुग्णालयांना अल्प प्रमाणात का होईना रेमडेसिविर इंजेक्शनचा साठा प्राप्त झाला असला तरी करोना समर्पित खासगी रुग्णालयांना मात्र अद्याप पुरवठा न झाल्याने पालघर तालुक्यात अद्याप रेमडेसिविर इंजेक्शनचा तुटवडा कायम आहे. याचा गैरफायदा घेत मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असून काही औषधे विक्रेत्यांकडून हे इंजेक्शन पाच हजार रुपये प्रतिनग इतक्या किमतीने विकले जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. गरजू लोक तर ठाणे व भिवंडी येथून हे इंजेक्शन मागवत आहेत.

जिल्ह्यात पालघर तालुक्यात करोनाचे सर्वाधिक २१८० रुग्ण उपचार घेत असून शासकीय रुग्णालयांबराबर या ठिकाणी मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांतही करोनावर उपचार सुरू आहेत. सध्या खासगी रुग्णालयांत दीडशे खाटा असलेली रुग्णालय कार्यरत आहेत. या ठिकाणी बाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून रुग्णाच्या नातेवाईकांकडे रेमडेसिविर इंजेक्शनसाठी तगादा लावण्यात येत आहे. परिणामी, इंजेक्शन मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची दमछाक होत आहे. त्यातच इंजेक्शनचा तुटवडा असल्याने आपल्या रुग्णाला ते मिळावे यासाठी त्यांचे नातेवाईक वाट्टेल ती किंमत मोजण्यास तयार होत आहेत.  याचा गैरफायदा घेत काही विक्रेते इंजेक्शनचा काळाबाजार करीत आहेत. बोईसर भागात काहींनी तर आपली दुकानेच थाटली असून विना देयक ही इंजेक्शन आणून दिली जात आहेत.

जिल्ह्यातील औषध विक्रेत्यांकडे याचा अधिकृत साठा उपलब्ध नसला तरीही काही विक्रेते इंजेक्शन इतर ठिकाणाहून मिळवून देतो असे सांगून रुग्णांकडून वाढीव दराने पैसे उकळताना दिसून येतात. बोईसर येथील एका औषध विक्रेत्याने दलालांच्या साहायाने दहा हजार रुपयांत दोन इंजेक्शन उपलब्ध करून दिल्याची माहिती पुढे आली आहे. त्याचप्रमाणे काही नागरिकांनी भिवंडी व ठाणे भागातून वाढीव किमतीने इंजेक्शन आणत असल्याची माहिती पुढे आली आहे.

जिल्ह्यासाठी केवळ ६१८ कुप्या

ल्ल जिल्ह्यासाठी शासनाकडून दररोज ६१८ रेमडेसिविर इंजेक्शनचा कोटा मंजूर केला असून या अन्न व औषध प्रशासनालयाच्या देखरेखीखाली त्याचे वितरण होणार आहे. हे इंजेक्शन शासकीय तसेच मान्यताप्राप्त करोना रुग्णालयांच्या क्षमतेनुसार वितरित करण्यात येणार आहे. वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रातील करोना रुग्णालयांची क्षमता पाहता पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अडीचशे ते तीनशे इंजेक्शन उपलब्ध होतील असे दिसून येते.

सद्यस्थितीत जिल्ह्यात ११ हजार ३३८ उपचाराधीन रुग्ण असून त्यापैकी वसई-विरार महानगरपालिका क्षेत्रात ७००६ तर ग्रामीण भागात ४३३२ रुग्ण आहेत. जिल्ह्याातील रुग्णसंख्या येत्या काही दिवसात १५ हजारांचा टप्पा पार करतील अशी शक्यता असून शासनाकडून पुरवठा करण्यात येणारे रेमडेसिविर इंजेक्शन साठा रुग्ण संख्येच्या तुलनेत अपुरा पडत राहणार आहे. लोकप्रतिनिधींनी  शासनदरबारी पाठपुरावा करणे आवश्यक असल्याची मागणी केली जात आहे.

खाटांच्या प्रमाणात इंजेक्शन पुरवठा होणार

रिवेरा रुग्णालय विक्रमगड, टिमा रुग्णालय बोईसर, ग्रामीण रुग्णालय पालघर तसेच उपजिल्हा रुग्णालय डहाणू येथे करोनाचे गंभीर रुग्ण दाखल करण्यात येत असून रुग्णालयाच्या क्षमतेच्या सुमारे दहा टक्के रुग्णांकरिता रेमडेसिविर इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येईल असे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी स्पष्ट केले आहे. हा पुरवठा रुग्ण संख्येच्या तुलनेत व सर्व शासकीय रुग्णालयांना समप्रमाणात करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.

डहाणू करोना तपासणीसाठी गैरसोय

डहाणू तालुक्यातील पश्चिम किनारपट्टीच्या भागात करोनाचे रुग्ण मोठ्या वाढत असताना त्या ठिकाणी वेगवेगळ्या तपासण्या करण्यासाठी मर्यादित केंद्र उपलब्ध असल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. गंभीर होणाऱ्या रुग्णांना सिटीस्कॅनसाठी बोईसर किंवा वापी येथे जावे लागत असून लांबवर जाऊनदेखील अनेकदा चाचणी होत नसल्याने गंभीर रुग्णांना इतरत्र स्थलांतरित करणे भाग पडत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 17, 2021 12:15 am

Web Title: remedivir injection shortage persists akp 94
Next Stories
1 करोनाबाधित गर्भवतींसाठी जूचंद्र येथे उपचार केंद्र
2 गृह अलगीकरणात ४ हजार १३२ रुग्ण
3 प्राणवायूचा मर्यादित वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
Just Now!
X