राज्यात पुन्हा एकदा करोना संकट वाढू लागल्याने सरकार आणि आरोग्य विभाग वारंवार नियमांचं पालन करण्याची विनंती करत आहे. करोना रुग्ण वाढत असतानाच राज्यावर पुन्हा एकदा लॉकडाउनचं संकट ओढावण्याची शक्यता आहे. अनेक लोकांकडून मास्कचा वापर न होणं ही रुग्णसंख्या वाढण्यामागचं एक कारण असल्याचं सांगितलं आहे. यादरम्यान सांगलीमध्ये शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी चक्क आमदारालाच मास्क काढायला सांगितल्याची एक घटना समोर आली आहे.

सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आळसंद गावामध्ये एका भूमिपूजनाच्या कार्यक्रमात संभाजी भिडे उपस्थित होते. यावेळी संभाजी भिडे यांनी शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांना उद्धाटनाआधी तोंडावरील मास्क काढायला लावला. करोना होत नाही मास्क काढा असं सांगितल्यावर बाबर यांनीदेखील मास्क काढून टाकला. विशेष म्हणजे यावेळी संभाजी भिडेंच्या मागे चांगलीच गर्दी होती. संभाजी भिडेंसहित तिथे उपस्थित एकानेही मास्क घातलेला नव्हता.

संभाजी भिडे यांनी फक्त आमदारच नाही तर तिथे उपस्थित आणखी एका व्यक्तीलाही मास्क काढायला सांगितला. त्यानंतरच अनिल बाबर यांच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आलं.

कारवाईची मागणी
“खानापूर मतदारसंघाच्या आळसंद गावात एका दुकानाच्या उद्दाटन कार्यक्रमात संभाजी भिडे उपस्थित होते. राज्यात करोना रुग्ण वाढत असताना आणि सरकारने मी जबाबदार मोहीम सुरु केली असतानाही संभाजी भिडेंनी स्वतः मास्क न घालता आमदाराला मास्क काढण्याची सूचना दिली म्हणून संभाजी भिडे यांच्यावर राज्य सरकारने तात्काळ करावी,” अशी मागणी आरपीआय खरात गटाचे नेते सचिन खरात यांनी केली आहे.