News Flash

सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार; शिवसेनेने रोखला जानकरांवर बाण!

संजय दत्त यांनी पक्षप्रवेश केल्याने धनगर समाजाचे सर्व प्रश्न सुटणार असतील तर त्यांच्या हाती काठी आणि घोंगडे द्यायलाच हवे.

अभिनेता संजय दत्त राष्ट्रीय समाज पक्षात प्रवेश करणार असल्याच्या वृत्ताचा हवाला देत शिवसेनेने पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना शेलक्या शब्दात टोले लगावले. संजय दत्त रासपमध्ये प्रवेश करणार असून पक्षाचा प्रचारही करणार आहे. जानकरांच्या दाव्याने करमणूक होत आहे. पण सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार, असा सवाल करीत शिवसेनेने जानकरांवर बाण रोखला आहे.

शिवसेनेने पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित करीत महादेव जानकर यांना खडेबोल सुनावले आहेत. अभिनेता संजय दत्त पक्षात प्रवेश करणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर म्हणाले आहेत. राजकारणातील निखळ विनोद संपत असला तरी जानकर यांच्या दाव्याने करमणूक झाली आहे. मेळावा धनगर समाजाचा होता व धनगरांच्या अनेक रखडलेल्या प्रश्नांना वाचा फुटेल असे वाटले होते, पण मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांनी मेळाव्याकडे पाठ फिरवली. महाराष्ट्रातील धनगर समाजातील अस्वस्थता यानिमित्ताने दिसून आली. सरकारने धनगर बांधवांसाठी अनेक योजना जाहीर गेल्या , त्या आजही कागदावरच आहेत. धनगर समाजाला मेंढी – पालनासाठी जागा आणि जागा खरेदीसाठी ७० कोटी अनुदानाची घोषणा केली. नवी मुंबई, पुणे, संभाजीनगर, नाशिक, नागपूर, अमरावती येथे धनगर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहे बांधण्याची योजना जाहीर केली. त्यासाठी दीडशे कोटी रुपयांची तरतूद केली. त्यातील किती वसतिगृहांचे कार्य सुरू झाले ? धनगर समाजास घरे, नोकऱ्या, प्रशिक्षण, चराई अनुदान वगैरेच्या योजना जाहीर झाल्या. या योजनांना गती देण्यासाठी महादेव जानकरांनी सरकारात जोर लावायलाच हवा, असा सल्ला शिवसेनेने दिला आहे.

२०१४ साली बारामतीत झालेल्या आंदोलनापासून अलीकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी नगर जिल्ह्यातील ‘ चौंढी ‘ येथे धनगर तरुणांनी आंदोलन केले. या आंदोलनात भाग घेतलेल्या असंख्य तरुणांवर गुन्हे आणि खटले दाखल झाले. यात अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या. या तरुणांवरील गुन्हे मागे घेण्याचा शब्द सरकारने दिला होता, पण शब्द देऊनही धनगर समाजातील तरुणांवरील गुन्हे मागे घेतले नाहीत. मुळात धनगर समाजाची आरक्षणाची पूर्ण न झालेली मागणी हा त्या समाजासाठी ज्वलंत विषय आहे. हे आरक्षण देण्याचे आश्वासनदेखील हवेतच विरले आहे. राज्य सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत ते देण्यात आले होते. आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कधीही लागू होण्याची वेळ आली तरी धनगर आरक्षणाचे भिजत घोंगडे तसेच आहे . त्याची भरपाई म्हणून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सर्व योजना सरकारने लागू केल्या आहेत, परंतु त्यामुळे आरक्षणाचे महत्त्व कमी होत नाही. आता संजय दत्त यांनी पक्षप्रवेश केल्याने धनगर समाजाचे सर्व प्रश्न सुटणार असतील तर त्यांच्या हाती काठी आणि घोंगडे द्यायलाच हवे. पण सिनेमावाले येऊन धनगरांना काय मिळणार ? संजय दत्त हे जानकरांच्या पक्षात प्रवेश करणार असतील तर शाहरुख खान, अक्षय कुमार हे रामदास आठवले यांच्या पक्षात प्रवेश करतील आणि सलमान खान वगैरे मंडळी आंबेडकर-ओवेसींच्या वंचित आघाडीत प्रवेश करण्यासाठी अर्ज देतील. सगळाच विनोद आहे. विनोदाची टवाळी होऊ नये इतकेच, असे शिवसेनेने म्हटले आहे.

‘कमळा’वरील भुंगे-
कमळ चिन्हावर निवडणूक लढणार नसल्याचे जानकर मेळाव्यात म्हणाले होते. त्यावरूनही शिवसेनेने त्यांना चिमटे काढले आहेत. जानकर म्हणाले की, त्यांचा पक्ष ‘कमळ’ चिन्हावर लढणार नाही . ते सगळे ठीक असले तरी गेली पाच वर्षे त्यांच्या पक्षाचा ‘भुंगा’ हा कमळ फुलाभोवती पिंगा घालत आहे. फूल, मग ते कुठलेही असो आणि भुंगा यांचे एकमेकांशिवाय पान हलत नाही. मात्र तरीही जानकर बोलले. आता हादेखील एक ‘सौम्य विनोद’ आहे असे कोणी समजू नये, असे म्हणत शिवसेनेने खरपूस समाचार घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 8:07 am

Web Title: shivsena criticised what will get to dhangar community after sanjay dutt entry in rsp bmh 90
Next Stories
1 बँक घोटाळा : शरद पवारांवरही गुन्हा दाखल होणार?
2 पापलेट जाळय़ात गावेना!
3 पत्नी, दोन मुलांना गळफास देऊन शेतकऱ्याची आत्महत्या
Just Now!
X