पत्नी आणि दोन मुलांचा खून करून बारचालकाने केलेल्या आत्महत्येप्रकरणी पाच खासगी सावकारांना पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये एका शिवसेना नगरसेवकाचाही समावेश आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सोलापूर महापालिकेचे शिवसेनेचे नगरसेवक लक्ष्मण ऊर्फ काका यल्लप्पा जाधव (वय ६३, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं.३, सोलापूर) आणि दशरथ मधुकर कसबे (वय ४५, रा. मुकुंद नगर, भवानी पेठ, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

सावकारांकडून घेतलेली कर्जे आणि वसुलीसाठी सावकारांनी दिलेल्या त्रासामुळे आपण हे पाऊल उचलल्याचे मृत बार चालक अमोल जगताप यांनी सुसाईड नोटमध्ये नमूद केले होते. त्यानुसार पोलिसांनी संबंधित सावकार व्यंकटेश दंबलदिन्नी (वय ४१, रा. हैदराबाद रोड, सोलापूर) याला अटक केली होती. त्यानंतर पुढील तपासात शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणखी दोघा सावकारांना अटक केली. मृत जगताप यांनी सावकारांकडून एक कोटीपेक्षा अधिक कर्जे घेतली होती. दरम्यान, तपासात सावकारांची ही साखळी शिवसेना नगरसेवक लक्ष्मण जाधव आणि दशरथ कसबे यांच्यापर्यंत पोहोचली. त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या पथकाने सोलापूर-विजापूर मार्गावर कर्नाटकातील धुळखेड येथे नगरसेवक जाधव याला पकडले. तसेच गुन्हेगारी कारवायांमध्ये यापूर्वी दोनवेळा एमपीडीएची कारवाई झालेल्या दशरथ कसबे याचेही नाव या प्रकरणात असल्याने पोलिसांनी त्यालाही अटक केली आहे.

दरम्यान, जुना पुणे नाका हांडे प्लॉट येथे राहणारे मृत अमोल अशोक जगताप (वय ३७) हे सोलापूर-पुणे महामार्गावर कोंडी येथे गॅलेक्सी ऑर्केस्ट्रा बार नावाचे हॉटेल चालवित होते. टाळेबंदीपूर्वी व नंतर आर्थिक अडचणींमुळे अनेक खासगी सावकारांकडून त्यांनी पठाणी व्याजदराने कर्जे घेतली होती. परंतु टाळेबंदीमुळे व्यवसाय बंद झाल्याने आणि अन्य कारणांमुळे त्यांची प्रचंड आर्थिक कोंडी झाली होती. त्यातच सावकारांनी कर्ज वसुलीसाठी वारंवार त्रास देणे सुरू केले होते. त्यातूनच वैतागून अमोल जगताप यांनी गेल्या १३ जुलै रोजी आपल्या राहत्या घरात पत्नी मयुरी (वय २७) व मुले आदित्य (वय ७) आणि आयुष (वय ४) यांचा गळफास देऊन खून केला आणि नंतर स्वतः आत्महत्या केली. तत्पूर्वी, त्यांनी आपण हे टोकाचे पाऊल का उचलले याची माहिती देणारी सुसाईट नोट लिहून ठेवली होती. ती पोलिसांच्या हाती लागली त्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.