नागपूरमधील राज्य राखील पोलीस दलातील (एसआरपीएफ) शिपायाच्या आत्महत्येचे कारण अखेर समोर आले आहे. दोन सावकारांच्या जाचामुळे त्याने आत्महत्या केल्याचे समोर असून या प्रकरणी दोन जणांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला.

एसआरपीएफमध्ये कार्यरत असलेले विनोद घेवंदे (वय २९) यांनी बुधवारी स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली होती. ते तेराव्या बटालियनमध्ये होते. सध्या ते प्रतिनियुक्तीवर एसपीयूमध्ये कार्यरत होते. आठ वर्षांपूर्वी ते पोलीस दलात भरती झाले होते. चार वर्षांपूर्वी त्यांचा प्रियंका या तरुणीशी विवाह झाला असून त्यांना अडीच वर्षांची मुलगी आहे. लग्नानंतर ते दाते लेआऊट परिसरात राहत होते. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास त्यांनी पिस्तूलने स्वत:वर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. या प्रकरणाचा एमआयडीसी पोलिसांनी तपास सुरु केला.

पोलीस तपासात विनोद घेवंदे यांनी संगीता जाधवकडून १३ हजार रुपये आणि आकाश झाडेकडून (वय २२) २० हजार रुपये घेतल्याचे समोर आले. सहा महिन्यांपूर्वी त्यांनी हे कर्ज घेतले होते. विनोद यांनी पैशांची परतफेड केली नव्हती.  संगीता आणि आकाशने घेवंदे यांनी घेतलेल्या पैशांवर व्याज लावायला सुरुवात केली. यावरुन त्यांच्यात वाद झाला. त्यामुळे आकाश व संगीता त्यांना धमकी देत होते. या धमकी आणि त्रासामुळे कंटाळून घेवंदे आत्महत्या केली.