वरील छायाचित्र पाहिले की फुलपाखरांचा थवा एकाजागी जमले आहेत, असे स्वाभाविकपणे वाटेल. पण त्यामागे फुलपाखरांच्या पुनरुत्पादन साखळीशी निगडीत एक महत्वपूर्ण क्षण लपला आहे. निसर्गात लपलेले हे वैविध्य शनिवारी राधानगरी मध्ये पाहायला मिळाले.

पश्चिम घाटामध्ये सह्याद्री पर्वतरांगांच्या दक्षिण टोकाला कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हे अभयारण्य गव्यासाठी प्रसिद्ध आहे. दाजीपूर अभयारण्य नावाने ओळखल्या जाणाऱ्या या अभयारण्यात एकूण ३५ प्रकारच्या वन्यप्राण्यांची व २३५ प्रकारच्या पक्षी प्रजातींची नोंद झालेली आहे. या जंगलात १८०० प्रकारच्या वनस्पतीं पैकी १५०० पेक्षा जास्त फ़ुलझाडांच्या प्रजाती आहेत, तर ३०० औषधी वनस्पती आहेत. युनेस्कोने २०१२मध्ये राधानगरी अभयारण्याचा जागतिक वारसा यादीत समावेश केला आहे. याच जंगल परिसरात नेहमी मोहवणाऱ्या फुलपाखराचे वेगळे जीवनचित्र दिसून आले.

सौंदर्य पाहणाऱ्यांच्या नजरेत असते म्हणतात त्याचा प्रत्यय अनेकदा येतो. पावसाळ्यात तर निसर्गातील चमत्कृतीपूर्ण आविष्कार रानोमाळ, जंगलात आणि परिसरातही पाहायला मिळतात.जसे चिखलात कमळ उमलते, तसेच आज राधानगरी तालुक्यातील एका शेतात एक  हे मनमोहक दृश्य पाहायला मिळाले. इमिग्रंट (Emigrant) नावाच्या प्रजातीच्या फुलपाखरातील नर या शेण मातीमधून क्षार घेण्यासाठी एकत्र आले होते.

फुलपाखरामध्ये काही प्रजाती मधील नर मादीशी मिलन करण्यापूर्वी किंवा तदनंतर क्षार शोषण करण्यासाठी असे शेणाच्या, मातीच्या ढिगाऱ्यातून क्षार घेत असतात. फक्त नर असे शोषण करताना दिसतात. क्वचितच मादी असे करताना दिसते,असे बायसन क्लबचे अध्यक्ष सम्राट केरकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. हाच क्षण टिपला आहे राधानगरी येथील बायसन क्लबचे उपाध्यक्ष रुपेश बॊबाडे यांनी.