लोकसत्ता प्रतिनिधी
अकोला : जिल्ह्यात करोनाचे आणखी दोन बळी गेले आहेत. २० नव्या रुग्णांचीही नोंद रविवारी झाली. आतापर्यंत जिल्ह्यात ९४ रुग्ण दगावले असून एकूण रुग्ण संख्या १८७९ झाली आहे. जिल्ह्यात पुन्हा एकदा करोनाबाधितांच्या मृत्यूचे सत्र सुरू झाल्याने चिंतेचे वातावरण आहे.
जिल्ह्यात करोनाच्या प्रकोपाने अद्याापही थांबण्याचे नाव घेतलेले नाही. आता शहरीपेक्षा ग्रामीण भागात करोना झपाट्याने पसरत आहे. तालुका स्तरावरील गावे करानाचे हॉटस्पॉट म्हणून समोर येत आहेत. रुग्ण संख्या वाढत असतांना मृत्यूच्या घटना देखील दररोज समोर येत आहेत. गत दोन दिवसांपासून पुन्हा मृत्यूची मालिका सुरू झाली. आज खासगी व शासकीय रुग्णालयात प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला.

जिल्ह्यातील एकूण १३८ तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. त्यापैकी ११८ अहवाल नकारात्मक, तर २० अहवाल सकारात्मक आले आहेत. सध्या २७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, ओझोन रुग्णालयामध्ये करोनावरील उपचारासाठी दाखल असलेल्या ७८ वर्षीय पुरुष रुग्णाचा उपचार घेतांना मृत्यू झाला. ते सिंधी कॅम्प येथील रहिवासी होते, तर अकोट येथील ६० वर्षीय महिलेचा सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांना २५ जून रोजी दाखल करण्यात आले होते. आज दुपारी त्या दगावल्या.

आज सकाळी प्राप्त अहवालात २० जणांचे अहवाल सकारात्मक आले. त्यात आठ महिला व १२ पुरुष आहेत. त्यातील १३ जण अकोट येथील असून महान, बाळापूर येथील प्रत्येकी दोन तर सिंधी कॅम्प, मूर्तिजापूर व बार्शिटाकळी येथील रहिवासी प्रत्येकी एक रुग्ण आहे. सायंकाळी एकही अहवाल प्राप्त झाला नाही.
पंधराशेवर रुग्णांची करोनावर मात
आज दिवसभरात सर्वोपचार रुग्णालयातून चार, कोविड केअर सेंटर मधून ३०, आयकॉन रुग्णालयातून पाच, ओझोन रुग्णालयातून चार व खासगी हॉटेल येथून पाच अशा ४८ जणांना सुट्टी देण्यात आली. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण १५१२ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.
अकोल्यातील ४.९४ टक्के रुग्णांचा मृत्यू

जिल्ह्यामध्ये मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. गत दोन दिवसांपासून पुन्हा मृत्यूच्या घटना समोर आल्या. त्यामुळे मृत्यूदर ४.९३ टक्के झाला असून, राज्याच्या तुलनेत तो अधिक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ९४ जणांचा मृत्यू झाला असून, त्यात एका आत्महत्येचा समावेश आहे.