अमेरिकेने एकादशीच्या दिवशी चांद्रयान सोडल्यानेच त्यांची चांद्रमोहीम यशस्वी झाली असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. “भारतीय कालमापन पद्धतीला जगात तोड नाही. एक सेकंदाचा हजारावा भाग मोजण्याची पद्धतही भारतीय कालमापन पद्धतीत आहे” असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. “अमेरिकेने याच कालमापन पद्धतीचा उपयोग केला म्हणूनच अमेरिकेची चांद्रयान मोहीम यशस्वी झाली” असं संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे ते सोलापुरात बोलत होते.

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रयान २ ही मोहीम अगदी शेवटच्या टप्प्यात होती त्याचवेळी विक्रम लँडरचा इस्रोशी संपर्क तुटला. यामुळे सगळे भारतीय हळहळले. मात्र सगळ्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या पाठिशी उभं रहात त्यांच्या प्रयोगाला सलाम केला. ऑर्बिटर सात वर्षे चंद्राच्या कक्षेत फिरणार आहे. विक्रम लँडरचा शोध लागला असल्याचं वृत्तही आता समोर आलं आहे त्यामुळे इस्रोच्या वैज्ञानिकांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत. अशा सगळ्या स्थितीत संभाजी भिडे यांचं हे वक्तव्य समोर आलं आहे.

नवरात्रीत शिवप्रतिष्ठानच्या वतीने राज्यभरात दुर्गामाता दौडही आयोजित केली गेली आहे असंही संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांना जेव्हा चांद्रयान मोहीमेबाबत प्रश्न विचारण्यात आला तेव्हा ते म्हणाले की, “अमेरिकेने आत्तापर्यंत ३८ वेळा चंद्रावर उपग्रह सोडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचा प्रयत्न फसला. तेव्हा नासाच्या एका वैज्ञानिकाने भारतीय कालमापन पद्धतीचा अभ्यास केला आणि उपग्रह एकादशीच्या दिवशी सोडला. ज्यामुळे अमेरिकेची मोहीम यशस्वी झाली. एकादशीच्या दिवशी ब्रह्मांडातली स्थिती संतुलित असते. त्याचमुळे प्रयोग यशस्वी झाला” असंही संभाजी भिडे यांनी म्हटलं आहे.