नांदेड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा क्षेत्रांपैकी सर्वाधिक मतदार नांदेड-उत्तर (३ लाख १४ हजार ९२९), तर सर्वात कमी मतदार भोकरमध्ये (२ लाख ५५ हजार ५९९) आहेत. मागील ५ वर्षांत नांदेड लोकसभा मतदारसंघात २ लाख ४० हजार ६४२ मतदार वाढले आहेत.
गेल्या ३१ जानेवारीला नांदेड लोकसभा मतदारसंघात मतदार संख्या १६ लाख ६२ हजार १३३ होती. त्यानंतर राबविलेल्या नोंदणी मोहिमेत २४ हजार मतदारांची भर पडली. यात प्रामुख्याने तरूण व नवमतदार आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय मतदारसंख्या अशी – भोकर २ लाख ५५ हजार ५९९, नांदेड उत्तर ३ लाख १४ हजार ९२९, नांदेड दक्षिण २ लाख ९२ हजार २२८, नायगाव २ लाख ७२ हजार ८०९, देगलूर (राखीव) २ लाख २८ हजार ७९५ व मुखेड २ लाख ६७ हजार ८९३. महिला मतदारांची संख्या ८ लाख ८ हजार ३७१, तर पुरुष मतदारसंख्या ८ लाख ७७ हजार ८७३ आहे.
निवडणुकीत मतदानाचे प्रमाण वाढावे, या साठी आयोगाने मतदानाच्या वेळेत वाढ (सकाळी ७ ते सायंकाळी ६) केली आहे. शिवाय स्थानिक पातळीवर प्रशासनाच्या पुढाकारातून जनजागृती केली जात आहे. मतदारांना प्रशासनाकडूनच पोल चिटचे वाटप करण्यात येणार असून, या माध्यमातूनही मतदानाचा हक्क बजावावा, या संदेशाचा प्रसार होणार आहे.
काँग्रेस पक्षासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हेच पक्षाचे उमेदवार असून मतदानाचे प्रमाण वाढावे, या साठी कार्यकर्ते सरसावले आहेत. मात्र, भाजप उमेदवार, कार्यकर्ते तसा प्रयत्न करताना दिसत नाहीत. काँग्रेस उमेदवार अशोक चव्हाण यांनी बुधवारी दोन स्वतंत्र कार्यक्रमांद्वारे तरुणांशी संवाद साधला. तरुणांचे मतदान काँग्रेसकडे वळविण्यासाठी काँग्रेसने प्रयत्न चालवले आहेत.