राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलेल्या बंडासंदर्भात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराडमधील पत्रकार परिषदेमध्ये भाष्य केलं आहे. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना पवारांनी अनेक प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळेच पवार यांना ‘अजित पवारांच्या बंडामागे तुमचा हात आहे असं म्हटलं जातंय. तर सामान्य लोकांचा हा गैरसमज तुम्ही कसा दूर कराल,’ असा सवाल विचारण्यात आला. या प्रश्नाही पवारांनी सविस्तर उत्तर दिले. साताऱ्यात प्रीतीसंगमावर यंशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

अजित पवारांच्या बंडामागे शरद पवारांचा हात असल्याची चर्चा फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासूनच सुरु झाली होती. याचबद्दलच्या प्रश्नाला पवारांनी “या सर्वांमागे माझा हात असेल असा तुमचा (पत्रकारांचा) गैरसमज असेल जनतेचा नाही,” असं म्हणत उत्तर देण्यास सुरुवात केली. “या मागे माझा हात असेल तर मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना सांगितलं असतं आणि मी त्यांच्याबरोबर चर्चा केली असती. त्यांना पटवून दिलं आणि सांगितलं तर ते माझ्या सूचनेचा अनादर करत नाहीत असा माझा आतापर्यंतचा अनुभव आहे. त्यामुळे यामागे माझा हात असेल असं म्हणण्यात काही अर्थ नाही,” असंही पवार या प्रश्नाला उत्तर देताना पुढे म्हणाले.

“एखाद्या व्यक्तीचं मत वेगळं असू शकतं. हे मत पक्षाच्या बैठकीत मांडल्यानंतर त्यादृष्टीने वेगळी पाऊलं टाकली जाऊ शकतात. पण असे निर्णय व्यक्तिगत नसतात तर पक्षाचे असतात,” असं सांगत शरद पवार यांनी अजित पवारांचा निर्णय़ वैयक्तिक असून राष्ट्रवादी पक्षाचा त्याच्याशी काही संबंध नसल्याचं सांगितलं. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही असा विश्वास यावेळी शरद पवारांनी व्यक्त केला. “बहुमत नसतानाही भाजपानं सरकार बनवलं, केंद्रातील सत्ता, राज्यपाल याचा गैरवापर करण्यात आला,” असल्याचा आरोप केला. पक्ष म्हणून राष्ट्रावादी सरकारमध्ये सामील नाही. हा पक्षाचा निर्णय नाही, त्याच्याशी आम्ही सहमत नाही असं यावेळी शरद पवार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं.