खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे प्रतिपादन

अलिबाग : राज्यात सत्तेत असलेल्या युती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून केवळ जनतेला फसविण्याचे काम केले नाही, तर महाराजांचा अपमान करण्याचे पाप देखील केले आहे. राज्यातील मतदार या सरकारला माफ करणार नाही आणि सत्तेवरुन खाली खेचून ख-या अर्थाने छ. शिवरायांच्या, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या, बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे अर्थात काँग्रेस, राष्ट्रवादी काँँग्रेस पक्षाचे सरकार सत्तेत आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. महाड विधानसभा मतदार संघातही माणिक जगताप यांचा आमदार म्हणून राज्याभिषेक झाल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी आज शिवस्वराज्य यात्रेच्या सांगता आणि आघाडीच्या प्रचार सोहळयात व्यक्त केला.

खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने काढलेल्या शिवनेरी ते रायगड या शिवस्वराज्य यात्रेच्या समारोप आज किल्ले रायगडवर करण्यात आला. त्यानंतर महाड शहरातील  शिवाजी चौकात  यात्रेची  सांगता आणि आघाडीचे उमेदवार माणिक जगताप यांच्या प्रचाराची सभा घेण्यात आली. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील, रायगडचे खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमोल मिटकरी, आ. संजय कदम, आ. अनिकेत तटकरे, महाडचे माजी आमदार माणिक जगताप, रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे, महाडच्या नगराध्यक्षा स्न्ोहल जगताप, राष्ट्रवादीकाँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, सरचिटणीस सौ. अपेक्षा कारेकर आदि मान्यवर आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या भाषणामध्ये खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी राज्यातील युती सरकारवर आक्रमक भाषेत टीकास्त्र सोडले. महाडचे आमदार भरत गोगावले यांनाही त्यांनी टीकेचे लक्ष्य केले. गुजराथमध्ये केवळ पाच वर्षांत चार हजार कोटी रूपये खर्च करून सरदार वल्लभ्भाई पटेल यांचा पुतळा उभा राहीला. महाराष्ट्रात अरबी समुद्रातील शिवस्मारकाची आणि इंदू मीलमधील भारतरत्न डाँँ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची एक वीट देखील उभी राहिलेली नाही. छत्रपती शिवरायांच्या नावाने शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर करून शेतकऱ्यांची फसवणूक आणि महाराजांचा अपमान करण्याचे काम या सरकारने केले आहे. गडकिल्ले भाड्याने देण्याचा निर्णय निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली तरी मागे घेण्यात आलेला नाही. महाडचे आमदार किल्ले रायगडवर शिवसमाधीवर उभे राहून पक्षाच्या आणि नेत्यांच्या घोषणा देत शिवसमाधीचा अपमान करतात. सत्तेचा माज हेच या सर्वाचे कारण आहे. महाराज त्यांना बघून घेतीलच. पण जनतेनेही त्यांना माफ करता कामा नये असे आवाहन त्यांनी केले.