सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा या मागणीसाठी कोल्हापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्याप्रकरणी खासदार विशाल पाटील, महेश खराडे यांच्यासह ५० आंदोलकाविरुध्द सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा, या मागणीसाठी खासदार विशाल पाटील यांच्यासह शक्तिपीठ महामार्ग कृती समिती आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सांगलीतील अंकली येथे रास्ता रोको आंदोलन केले होते. या आंदोलनावेळी आंदोलकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे सांगली ते कोल्हापूर महामार्ग आणि रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
सांगली जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांनी २० जून रोजी बंदी आदेश लागू केला होता. परंतु असे असताना देखील खासदार पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष खराडे यांच्यासह शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन करून वाहतूक रोखली होती. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचा आदेशाचा भंग केल्याचा ठपका ठेवत ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये खासदार पाटील, खराडे यांच्यासह सतीश साखळकर, भूषण गुरव, घनशाम नलवडे, विष्णू सावंत, प्रकाश टकले, योगश पाटील, प्रभाकर तोडकर, अभिजित जगताप, आनंदराव पाटील, शुभांगी शिंदे, दिनकर साळुंखे, उमेश एडके, संध्या कांबळे आदींसह ४० ते ५० जणांचा समावेश आहे.