‘तो मी नव्हेच..’चा पवित्रा

सोलापूर : शेअर बाजारातील गुंतवणुकीतून आकर्षक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून बार्शी शहरात कोटय़वधी रुपयांचा घोटाळा केल्याच्या गुन्ह्यात प्रमुख आरोपी असलेला विशाल अंबादास फटे सोमवारी रात्री स्वत:हून सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर झाला. त्यास अटक करण्यात आली आहे. दरम्यान, पोलिसांत हजर होण्यापूर्वी एका चित्रफितीच्या माध्यमातून फटे याने आपल्यावरील सर्व आरोप फेटाळत ‘तो मी नव्हेच ’ चा पवित्रा घेतला आहे. बार्शी शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात विशाल फटे (वय ४५) हा फरारी होता. तर त्याचे वडील अंबादास गणपती फटे (वय ७०) आणि भाऊ वैभव फटे (वय ४०) हे दोघे अटकेत आहेत. त्यांना २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. याशिवाय फटे याची पत्नी राधिका आणि आई अलका यादेखील आरोपी असून त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत. रात्री आठच्या सुमारास विशाल फटे हा सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयात स्वत: पायी चालत येऊन हजर झाला. यावेळी त्याच्या हातात पिशवी होती. तत्पूर्वी, फरारी असताना विशाल फटे याने आपल्यावरील आर्थिक फसवणुकीचे सर्व आरोप एका चित्रफितीच्या माध्यमातून फेटाळले. त्याने स्वत:चे म्हणणे मांडलेली चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित झाली आहे.

गुंतवणूकदारांनी माझ्यावर विश्वास असेल तर थोडे दिवस वाट पाहावी. ज्यांना विश्वास नसेल तर त्यांनी माझ्या विरोधात खुशाल खटले दाखल करावेत. यात जी शिक्षा होईल, ती भोगण्याची आपली तयारी आहे. माझा पळून जाण्याचा बेत नव्हता आणि मी पळूनही जाणार नाही. माझी बँकखाती पोलिसांनी गोठवली आहेत. बँक खात्यांवर सुमारे दोन कोटींची रक्कम जमा आहे. मला पळूनच जायचे असते तर मी बँक खात्यावरील सर्व रक्कम काढून पळून गेलो असतो. त्या आधारे चार-पाच वर्ष उत्तम प्रकारचे जीवन जगू शकलो असतो. परंतु माझा पळून जाण्याचा अजिबात हेतू नव्हता. काही गोष्टींची तजबीज करण्याचा मी प्रयत्न केला. त्याच अवधीत या सर्व गोष्टींचा बोभाटा झाला. त्यामुळे मला स्वत:ला काहीही हालचाल करता आली नाही. परंतु आपण लवकरच नजीकच्या पोलीस ठाण्यात स्वत:हून हजर होणार आहोत, असे फटे याने चित्रफितीत म्हटले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी सुध्दा माझ्या विरोधात तक्रारी दाखल करून घेताना सत्यतेबाबत कोणतीही खात्री केली नाही. माझ्या बँक खात्यावरील व्यवहार तपासा, त्यातील रकमा कोणाला कधी दिले, हेही पाहा. कोणाला परताव्याची रक्कम मिळाली नसेलही, परंतु आपण हे जाणीवपूर्वक केले नाही, असा बचावही फटे याने केला आहे. लोकांनी बार्शीत माझ्या घरावरचे पत्रे काढून नेले, घरावर दगडफेकही केली, गुंतवणूकदारांना मी दरमहा न चुकता परतावा देत होतो. या चांगल्या गोष्टींची जाणीव कोणालाही नाही. मी गुंतवणूकदारांचा एकही पैसा बुडवणार नाही. परंतु या प्रकरणात वृध्द आई-वडिलांसह कुटुंबीयांना अकारण गोवण्यात आले आहे. गरज नसताना आई-वडिलांना म्हातारपणातील दिवस विनाकारण तुरुंगात घालविण्यात काहीही अर्थ नाही. त्यामुळे त्याचा तरी गुंतवणूकदारांनी विचार करावा, असेही आवाहन फटे याने केले होते.