सोलापूर : सोलापूरच्या शेजारी धाराशिव जिल्ह्यात तरुणाईला घातक विळखा घातलेल्या मेफेड्रोन (एमडी) या अमली पदार्थाच्या तस्करीचे प्रकरण गाजत असताना लगतच्या बार्शी शहरात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तिघा जणांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून २० ग्रॅम मेफेड्रोनसह गावठी पिस्तूल, जिवंत काडतुसे असा सुमारे १३ लाख २४०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या कारवाईत अटक झालेला प्रमुख आरोपी धाराशिव जिल्ह्यातील मेफेड्रोन तस्करीप्रकरणी गुन्ह्यात धाराशिव पोलिसांना पाहिजे होता. मात्र, अनेक दिवसांपासून सापडत नव्हता. हा प्रमुख आरोपी एका वजनदार राजकीय नेत्याचा अनुयायी मानला जात असून, त्याची छबी संबंधित वजनदार नेत्याच्या स्वागत डिजिटल फलकावर झळकली होती.
असद हसन देहलूज (वय ३७, रा. परांडा, जि. धाराशिव) याच्यासह मेहफूज मोहम्मद शेख (वय १९, रा. बावची, ता. परांडा) आणि सर्फराज ऊर्फ गोल्डी अस्लम शेख (कसबा पेठ, बार्शी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बार्शी-परंडा रस्त्यावर बार्शी शहर पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईत असद देहलूज याच्या ताब्यातून ९१ हजार ९०० रुपये किमतीचे ९.१९ ग्रॅम मेफेड्रोन अमली पदार्थासह १० लाख रुपये किमतीची टोयोटा कोरोला आल्टिस मोटार, गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर त्याचा साथीदार मेहफूज शेख याच्याकडून ५७ हजार ३०० रुपये किमतीचे ५.७३ ग्रॅम मेफेड्रोन आणि मोबाइल संच, तर तिसरा साथीदार सर्फराजकडे ५१ हजार २०० रुपये किमतीचे ५.१२ ग्रॅम मेफेड्रोन, मोबाइल संच आणि इलेक्ट्रॉनिक वजनकाटा सापडला.
या तिघा जणांविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे तपास करीत आहेत. ही कारवाई तुलनेने किरकोळ दिसून येत असली, तरीही यामागे मेफेड्रोन तस्करीची मोठी संघटित टोळी असू शकते, असा कयास वर्तविला जात आहे.