नांदेड : बेफाम अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील यच्चयावत शेतकरी मानसिकदृष्ट्या घायाळ झालेले असताना फडणवीस सरकारच्या यंत्रणेने परिस्थितीचे तारतम्य न राखता ‘शक्तिपीठ’साठी जमीन मोजणीचा आणखी एक ‘वार’ केला आहे. मंत्री संजय राठोड गुरूवारी जिल्ह्यात आले असता प्रस्तावित महामार्ग नंतर करा, आधी शेतकऱ्यांना जगवा अशा शब्दांत कार्यकर्त्यांनी त्यांना सुनावले.
महायुती सरकारने आखलेल्या नागपूर ते गोवा ह्या शक्तिपीठ महामार्गाला बहुसंख्य जिल्ह्यांतील बाधित शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला असून त्यांचे नेतृत्व कोल्हापूरचे आमदार सतेज पाटील करत आहेत.
मागील काही आठवड्यांतील अतिवृष्टीमुळे हिंगोली, नांदेड, परभणी या जिल्ह्यांतील शेतजमिनींना जबर तडाखा बसला. लाखो शेतकरी आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या खचलेले असताना हिंगोली जिल्ह्यातल्या काही गावांमध्ये शक्तिपीठ महामार्गासाठी संपादित केल्या जाणाऱ्या जमिनींची मोजणी करण्याचे पथक दाखल झाले. त्यावर शक्तिपीठ महामार्ग विरोधातील कृतिसमितीचे सतीश कुलकर्णी यांनी तीव्र हरकत घेतली. सरकारी यंत्रणेने त्यातून आपली असंवेदनशीलता दाखवून दिल्याचे कुलकर्णी यांनी येथे नमूद केले.
कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा येथे अधिकाऱ्यांनी दबावतंत्र वापरून मोजणी करण्याचा प्रयत्न केला ; पण बाधित शेतकऱ्यांनी तो हाणून पाडला. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातही शक्तिपीठसाठी जमीन संपादित केली जाणार आहे. या विषयात खा. अशोक चव्हाण यांनी आधी शेतकऱ्यांची मागणी उचलून धरली होती ; पण अलीकडच्या काळात ते समन्वयाची भाषा करत आहेत.दरम्यान आ. सतेज पाटील यांनी गुरूवारी मालेगाव येथील काही कार्यकर्त्यांशी संपर्क साधून अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची माहिती घेतली. मालेगावच्या मातीशी नाते सांगणाऱ्या नेत्याने या काळात जी आस्था दाखविली नाही, ती आ. सतेज पाटील यांनी कोल्हापूरहून दाखविली, असे वरील कार्यकर्त्यांनी म्हटले आहे.
महायुती सरकारमधील मंत्री संजय राठोड यांनी गुरूवारी हदगाव आणि अर्धापूर तालुक्यातील काही भागांस भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या परिस्थितीची माहिती शेतकरी प्रतिनिधींकडून घेतली. या भेटीदरम्यान कार्यकर्त्यांनी महामार्गाची घाई कशासाठी करता, असा सवाल करत शेतकऱ्यांना नीट जगविण्याचे कर्तव्य पार पाडण्याचा सल्ला राठोड यांना दिला.
महायुतीतील बेबनाव
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीदरम्यान महायुतीतील बेबनाव समोर आला. मंत्री संजय राठोड गुरूवारी अर्धापूर तालुक्यात आले, तरी या भागाच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी तेथे जाणे टाळले. नंतर मंत्र्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या बैठकीकडे श्रीजया यांनी पाठ फिरवली. खा. अशोक चव्हाणही बैठकीला गेले नाहीत.