अहिल्यानगर : महापालिकेच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेचे सत्ताधारी पक्षांकडून स्वागत तर विरोधी पक्षांच्या विरोधी प्रतिक्रिया उमटल्या. आता या प्रभाग रचनेचा परिणाम महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूंच्या जागा वाटपावर होणार असल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर या प्रारूपाच्या माध्यमातून जागा वाटपाच्या चर्चेतील अडथळाही दूर झाल्याचे मानले जाते. मागील प्रभाग रचना डोळ्यांसमोर ठेवून गेल्या काही महिन्यात शहरात पक्षांतरे घडली, त्यांना धक्का बसलेला आहे. या सर्वातून प्रारूप रचनेवर मोठ्या संख्येने हरकती दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जाते.
प्रामुख्याने शहराच्या मध्यवर्ती भागातील प्रभागात अधिक बदल झाले आहेत. या प्रभागांवर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे वर्चस्व होते. मात्र या गटातील बहुसंख्य माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला तर काही जणांनी भाजपची वाट धरली. मुस्लिम बहुल क्षेत्रात मात्र महायुतीतील घटक पक्षांना फारसे स्थान राहिलेले नाही. केडगाव उपनगरातील प्रभागात फारसे बदल झालेले नाहीत.
नालेगाव, कल्याण रस्ता, सिव्हिल हडको, झेंडीगेट या भागातील प्रभागांची बरीचशी तोडफोड झालेली आहे. तोफखाना व माळीवाडा परिसरातील प्रभाग रचना काही प्रमाणात बदलली गेली आहे. सावेडी उपनगरात प्रामुख्याने भाजपचे प्राबल्य होते. तेथेही काही बदल झाले आहेत.
भाजपचे माजी महापौर बाबासाहेब वाकळे, ठाकरे गटाच्या माजी महापौरांचे पती संजय शेंडगे, माजी उपमहापौर अनिल बोरुडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) माजी सभापती कुमारसिंह वाकळे, शिंदे गटाचे माजी सभापती सचिन जाधव, भाजपमध्ये नव्याने आलेले निखिल वारे व धनंजय जाधव, माजी सभापती गणेश कवडे, माजी सभापती किशोर डागवाले, माजी महापौर सुरेखा कदम, माजी सभापती अविनाश घुले बाळासाहेब बोराटे यांच्या प्रभागांमध्ये मोठे बदल झालेले आहेत.
राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सन २०११ ची लोकसंख्या विचारात घेऊन प्रभाग रचनेची सुरुवात बोल्हेगाव उपनगरातून करून वळणे घेत शेवट केडगाव उपनगरात करण्यात आला आहे. प्रभात ४ मध्ये सर्वाधिक २२,४०५ तर प्रभाग क्रमांक १५ मध्ये सर्वात कमी १८५३७ लोकसंख्या आहे. प्रभागरचना तयार करताना प्रमुख रस्ते, महामार्ग, नदी, ओढेनाले याकडे दुर्लक्ष करून रचना करण्यात आली, असाही आक्षेप प्रामुख्याने घेतला जात आहे. प्रत्येकी चार सदस्यांचे एकूण १७ प्रभाग आहेत, त्यामुळे सदस्यसंख्या ६८ असणार आहे.
महापालिकेची निवडणूक एकत्रित की स्वतंत्रपणे लढविली जाणार याबाबत महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही बाजूंकडून अद्याप स्पष्टता करण्यात आलेली नाही. जागावाटप समाधानकारक झाले नाही तर स्वबळाची भाषा जवळपास सर्वच पक्षांनी केलेली आहे. प्रभागरचनेच्या प्रतीक्षेत असलेली महायुती व महाविकास आघाडी या दोन्ही बाजूतील पक्षांमध्ये चर्चेचा मार्ग प्रारूपामुळे मोकळा झाल्याचे मानले जाते. तरीही प्रभागांचे आरक्षण कशा प्रकारचे असेल याची प्रतीक्षा असणारच आहे.