सातारा : ऐतिहासिक राजधानी सातारा येथील किल्ले अजिंक्यतारा, माहुली (सातारा) येथील महाराणी ताराराणी समाधी परिसर आणि मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या तिन्ही स्थळांच्या सुशोभीकरणाच्या कामाला मंजुरी देत ३५८.८९ कोटी रुपये निधी मंजूर केला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई येथे या वारशाच्या संवर्धनासंदर्भात बैठक झाली. बैठकीस शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नीतेश राणे, संबंधित अधिकारी आणि प्रकल्प सल्लागार उपस्थित होते. या बैठकीत सुशोभीकरण प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली असून, त्यासाठी ३५८.८९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले.
ताराराणी समाधी सुशोभीकरणासाठी १३३ कोटी, किल्ले अजिंक्यतारा सुशोभीकरणासाठी १३५ कोटी, तर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी ९०.८९ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे.
या सर्व ऐतिहासिक स्थळांचा पुनर्विकास करताना पुढील शंभर वर्षे टिकेल, अशी वास्तू उभारावी. त्या ठिकाणी पुरेसे वृक्षारोपण करावे, स्वच्छता राखावी, पर्यटन आणि व्यावसायिक दृष्टिकोनही ठेवावा, भविष्यातील देखभाल – दुरुस्ती बाबतही आतापासूनच उपाययोजना करावी असे आवाहनही पवार यांनी घेतला.
पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात झालेल्या बैठकीत साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ला, संगम माहुली, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचा विकास करताना मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपावं. संगम माहुलीच्या शिवकालीन राजघाट परिसरातील महाराणी ताराराणी, महाराणी येसूबाई, पहिले शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे जतन आणि संवर्धन, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण, संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक या स्थळांच्या परिसराचा पुनर्विकास करताना तेथील परिसर, समाधीस्थळ, प्राचीन वास्तूंचं मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपावं, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
साताऱ्यातील संगम माहुलीच्या शिवकालीन राजघाट परिसरातील मंदिर जीर्णोद्धार, समाधी स्थळ संवर्धन, अजिंक्यतारा किल्ल्यातील राजसदर, बुरुज, तटबंदीच्या दुरुस्ती कामांचा घाट परिसर विकासकामे तातडीने पूर्ण करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. यावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही ताबडतोब ही कामे मार्गी लावावी, अशा सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.
साताऱ्यातील संगम माहुलीच्या शिवकालीन राजघाट परिसरातील महाराणी ताराराणी, महाराणी येसूबाई, पहिले शाहू महाराज यांच्या समाधिस्थळांचे जतन आणि संवर्धन, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसराचे सुशोभीकरण, संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक या स्थळांच्या परिसराचा पुनर्विकास करताना तेथील परिसर, समाधी स्थळ, प्राचीन वास्तूंचं मूळ ऐतिहासिक सौंदर्य जपावं. – अजित पवार, उपमुख्यमंत्री.