पार्थ पवार यांचा २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते विधानसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चा वारंवार होत असतात. सध्या पार्थ पवार कारेगाव विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी याविषयावर आपली स्पष्ट भूमिका मांडली आहे. “पार्थ पवार कोरेगावमधून विधानसभा निवडणूक लढविणार हे धांदात खोटे आहे,” असं मत अजित पवार यांनी व्यक्त केलं. तसेच याविषयीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. ते सातारा येथे पत्रकार परिषदेत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना बोलत होते.
अजित पवार म्हणाले, “पार्थ पवार कोरेगावमधून विधानसभा निवडणूक लढविणार हे धांदात खोटे आहे. माध्यमांनीही खूप महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावे. अतिरंजित बातम्यांना प्राधान्य न देता समाजात शांतता, जातीय सलोखा राहील आणि समाजात तेढ निर्माण होणार नाही यासाठी माध्यमांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. शेवटी माध्यमांची विश्वासार्हताही महत्त्वाची आहे.”




“हंगाम संपत असला तरी कारखाने सुरू ठेवून शिल्लक उसाचा प्रश्न निकाली काढणार”
“कारखान्यांचा हंगाम संपत आला असला, तरी राज्याबरोबर साताऱ्यातही शिल्लक उसाचा प्रश्न मोठा आहे. यासंदर्भात साखर आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. हंगाम संपत आला असला, तरी कारखाने सुरू ठेवून शिल्लक उसाचा प्रश्न निकाली काढण्यात येईल,” असं आश्वासन यावेळी अजित पवार यांनी दिली.
“सगळ्या कारखान्यांकडून ऊस संपवण्याचा प्रयत्न”
अजित पवार म्हणाले, “यावर्षी पाऊस चांगला झाला झाल्याने उसाचे क्षेत्र वाढले आहे. त्याबरोबरच हेक्टरी टनेजही वाढले आहे. सगळे कारखाने ऊस संपवण्याचा प्रयत्न करत आहेत. सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांचे परिस्थितीवर लक्ष आहे. ते रोज आढावा घेत आहेत. साताऱ्यात अजिंक्यतारा कारखाना जास्त दिवस चालेल अशी परिस्थिती आहे.”
“ऊस संपवण्यासाठी अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे”
“शेतकर्यांचे नुकसान होऊ नये यासाठी इतर कारखान्यांकडून या उसाचे गाळप करावे. यासाठी १ मे पासून वाहतूक अनुदान आणि रिकव्हरी लॉस दिला जात आहे. सरकारकडून मिळणारे अनुदान थेट शेतकऱ्याला दिले जात आहे. शेतकऱ्याला चांगला दर मिळाला पाहिजे ही त्या मागची भूमिका आहे. त्या त्या विभागातील ऊस संपवण्यासाठी अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे,” असंही अजित पवार यांनी नमूद केलं.
“सरकारला अल्टिमेटम देणारे हे कोण?”
अजित पवार यांनी राज ठाकरे यांनाही प्रत्युत्तर दिलं. ते म्हणाले, “भोंग्याबाबत राज ठाकरे यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. मात्र केंद्र असो अथवा राज्य सरकार ते संविधानाच्या नियमानुसार चालत असतात आणि सरकारला अल्टिमेटम देणारे हे कोण? पोलीस यंत्रणा त्यांचे काम करीत आहे. कोणी कोणाला अल्टिमेटम देण्याच्या भानगडीत पडू नये.”
“पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न”
“इथं कायदा हातात घेण्याचा कोणालाच अधिकार नाही. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस त्यांचे काम करतील. यापूर्वीही काहींनी पोलिसांबद्दल चुकीची वक्तव्ये केलेली होती. त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र पोलिसांचे वर्तन कायद्यानुसार असल्याचे दिसून आले आहे,” असंही अजित पवार यांनी सांगितलं.
“ओबीसी आरक्षणाचा लाभ त्या वर्गाला मिळायलाच हवा”
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, “ओबीसी आरक्षणाचा लाभ त्या वर्गाला मिळायलाच हवा असे महाविकास आघाडीचे धोरण आहे. ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने निकाल दिला आहे. याबाबत सर्व स्तरावर चर्चा सुरू आहे. मध्यप्रदेशचा निकाल काय येतोय ते पाहून याबाबत निर्णय घेणार आहे.”
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवाव्यात”
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एकत्र लढवाव्यात असा आमचा सर्वांचा आग्रह आहे. परंतु काही निर्णय स्थानिक जिल्हा पातळीवर केले जातात. काही ठिकाणी दोन्ही तिन्ही पक्षांचे प्राबल्य असल्याचे दिसून येते. त्यामुळे त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण निवडणुका होतील. अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीत एकत्र येऊन याबाबत पुढचा निर्णय घेता येऊ शकेल,” असंही त्यांनी नमूद केलं.
“शरद पवार यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही”
शरद पवारांवरील आरोपांवर बोलताना अजित पवार म्हणाले, “शरद पवार यांनी कधीही जातीपातीचे राजकारण केले नाही. याबाबत त्यांच्यावर होणारे आरोप हे बिनबुडाचे आहेत. रामदास आठवले आणि राजू शेट्टी यांनीही शरद पवार हे जातीवादी नसल्याचे सांगितले आहे. शरद पवार हे नेहमीच सर्व समभावाची आणि समन्वयाची भूमिका मांडत असतात. त्यामुळे त्यांच्यावर होणारे सर्व आरोप हे खोटे आहेत.”
“संजय राऊत कार्यकर्त्यांना बरं वाटण्यासाठी बोलले असतील”
“शिरूर लोकसभा मतदार संघाबाबत संजय राऊत बोलले असतील, तर ते कार्यकर्त्यांना बरं वाटण्यासाठी बोलले असतील. याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. तो त्यांचा अधिकार आहे,” असेही अजित पवार शेवटी म्हणाले. या पत्रकार परिषदेत पालकमंत्री बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, मकरंद पाटील आदी उपस्थित होते.