महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असल्यामुळे इतर क्षेत्रांमध्ये वेळेवर अनुदान दिले जाईल, याची खात्री नाही असे मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काही दिवसांपूर्वी व्यक्त केलं होतं. त्यांच्या या विधानानंतर आता विविध राजकीय उमटू लागल्या आहेत. दरम्यान, यासंदर्भात आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही भाष्य केलं आहे.

अजित पवार यांनी आज लातूरमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर त्यांची भूमिका स्पष्ट केली. यादरम्यान त्यांना नितीन गडकरी यांच्या विधानाबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, लाडकी बहीण योजना राबवत असताना कोणतीही अडचण नाही, जर अडचण असती, तर आम्ही ही योजना कधी सुरुच केली नसती, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

हेही वाचा – Baramati Assembly Election : विधानसभेला बारामतीत काका-पुतण्या भिडणार का? कसं आहे राजकीय समीकरण?

नेमकं काय म्हणाले अजित पवार?

“गुंतवणूकदारांना सरकारकडून जमीन, पाणी वीज अशा अनेक गोष्टी दिल्या जातात. याशिवाय कंपन्यांना करातही सवलत दिली जाते. पण ती हातात देता येत नाही, ती कंपनी स्थापन झाल्यानंतरच दिली जाते. त्यामुळे नितीन गडकरी नेमके काय म्हणाले, त्याबाबत मी त्यांच्याशी बोलेन, त्यांच्याकडून माहिती घेईन, पण ही योजना राबवताना कोणतीही अडचण नाही. जर अडचण असती, तर आम्ही ही योजना सुरु केली नसती, जे आम्हाला शक्य असतं, त्याच गोष्टी आम्ही करतो”, असं अजित पवार म्हणाले.

“विरोधकांच्या टीकांकडे आम्ही लक्ष देत नाही”

पुढे बोलताना त्यांनी विरोधकांनाही लक्ष्य केलं. “आधी विरोधक म्हणायचे की लाडकी बहीण योजना बोगस आहे, पैसे मिळणार नाही. पण पहिल्या दोन हफ्त्याचे पैसे मिळाल्यानंतर म्हणाले, ही सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही ती योजना बंद करू. पण ही योजना राज्यात महिलांमध्ये सर्वात लोकप्रिय झाली आहे. त्याबाबत सतत काही ना काही टीपणी विरोधकांकडून केली जात आहे. मात्र, त्याकडे आम्ही लक्ष देत नाही”, असं त्यांनी सांगितलं.

हेही वाचा – Kamlesh Kumar Singh : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मोठा धक्का; ‘हा’ आमदार भाजपात प्रवेश करणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“टीका करण्यासाठी मुद्दे नसल्याने विरोधकांकडून आरोप”

दरम्यान, सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अनेक उद्योग महाराष्ट्राबाहेर जात आहेत, असा आरोपही विरोधकांकडून केला जातो आहे, याबाबत विचारलं असता, “निवडणूक जवळ येताच विरोधकांकडून अफवा पसरवण्याचे काम सुरू आहे. सातत्याने ही कंपनी जाणार, ती कंपनी जाणाऱ्या अशा गोष्टी सांगितल्या जात आहेत. मात्र, हे साफ खोटं आहे. राज्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक सुरू आहे. किर्लोसकर आणि टोयोटा कंपनी त्यांचा जो विस्तार करत आहे, तो संभाजीनगरमध्ये करत आहे. जेएसडब्लू कंपनीनेही राज्यात ४० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. अमरावतीतही अनेक विकासकामांचं भूमिपूजन करण्यात आलं आहे. पण टीका करण्यासाठी मुद्दे नसल्याने असे आरोप केले जात आहेत. आपण काही तरी वेगळं करतो आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न विरोधकांकडून होतो आहे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.