सांगली : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार अरूण लाड यांचे पुत्र आणि क्रांती सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष शरद लाड यांनी मंगळवारी मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी त्यांचे भाजपमध्ये स्वागत केले.

पलूस तालुक्यातील कुंडल येथील क्रांती समूह हा डाव्या विचारांचा म्हणून परिचित असून, या विचारांचा पाया स्वातंत्र्य काळात क्रांतीअग्रणी जी.डी. बापू लाड यांनी घातला. बापूंच्या समाजसेवेचा वारसा घेऊन आमदार लाड हे राष्ट्रवादी काँग्रेसचा विचार घेऊन समाजसेवेत कार्यरत राहिले. पुणे पदवीधर मतदार संघातून ते विधान परिषदेवर निवडून आले असून, त्यांचा कार्यकाल पुढील वर्षी समाप्त होत आहे.

डाव्या, पुरोगामी चळवळीचा वारसा असलेल्या लाड कुटुंबातील तिसऱ्या पिढीचे नेतृत्व करणारे शरद लाड यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लाड यांचा परिचय करून देत असताना तरुण पिढीला भाजपचा विकासाचा विचार मान्य होत असल्याचे प्रतिपादन केले.

यानंतर बोलताना युवा नेते लाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर आपण प्रभावीत होऊन भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे सांगत यापुढील काळात भाजप विचारांवर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसह सर्व निवडणुकीमध्ये पक्षाचा कार्यकर्ता म्हणून कार्यरत राहीन, असा विश्वास व्यक्त केला.

प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी लाड यांचे पक्षात स्वागत करत असताना देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी सामान्य माणसाला विकासाचा लाभ मिळाला पाहिजे, या पद्धतीची धोरणे अवलंबत असून, राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनीही तेच धोरण घेऊन राज्य सर्व बाबतीत अव्वल स्थानी असावे, या दृष्टीने कार्य करत आहेत. युवा पिढीला पक्षाची भूमिका पटत असून, सर्वजण या विकासाच्या यात्रेत सहभागी होत आहेत, ही चांगली गोष्ट आहे. शत प्रतिशत भाजप हे पक्षाचे धोरण असून, या दिशेने पक्षाची वाटचाल सुरू असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले.

श्री. लाड यांच्या पक्षप्रवेश सोहळ्यास पलूस, कडेगाव तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच आ. सुधीर गाडगीळ, भाजप ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख, पृथ्वीराज पाटील, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम आदी यावेळी उपस्थित होते.

लाड यांच्या भाजप प्रवेशासाठी गेले दोन महिने प्रयत्न सुरू होते. श्री. कदम यांनी त्यांची मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घडवून आणली. लाड यांच्या पक्षप्रवेशामागे पुढील वर्षी होत असलेल्या पदवीधर मतदार संघाची निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.

अनिता सगरेही भाजपच्या वाटेवर

जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष जयश्री पाटील, संचालक पृथ्वीराज पाटील, शरद लाड यांच्या पाठोपाठ संचालिका आणि महाकाली सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे याही भाजपच्या वाटेवर असल्याची जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे. महाकाली साखर कारखाना गेली सहा वर्षे बंद असून, सध्या थकीत कर्जापोटी या कारखान्याचा ताबा जिल्हा बँकेने घेतला आहे.