नांदेड : न्यायालयीन दणक्यानंतर मराठा आंदोलनामध्ये समेट घडविण्याचे सरकारी पाऊल मुंबईतील आझाद मैदानात मंगळवारी दूपारनंतर पडले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्रेय देण्यासाठी, त्यांचे अभिनंदन करण्यासाठी स्थानिक भाजपामध्ये चढाओढ लागली असून यांत खासदार अशोक चव्हाणही सहभागी झाले; पण समाज माध्यमांतील प्रतिक्रियांतून ते कठोर टीकेचे धनी बनले आहेत.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे मुंबईतील बेमुदत उपोषण सुरू होण्याच्या सुमारास या समाजासाठी फडणवीस यांनी आजवर काय काय केले, याची जंत्री भाजपातील त्यांच्या भक्तांनी ठिकठिकाणी फलकांच्या माध्यमातून सादर केली होती. नांदेडचे माजी नगरसेवक महेश खोमणे यांनी तर मुंबईत अत्यंत मोक्याच्या ठिकाणी फलक लावण्याची तत्परता दाखविली होती. मंगळवारी सायंकाळी जरांगे यांचे उपोषण थांबताच खोमणे यांचे ‘देवाप्रेम’ नव्या उत्साहात उजागर झाले. ‘नेता शब्द पाळणारा…!’ या शीर्षकाखालील त्यांचे फलक रातोरात झळकले.
खोमणे यांचे फलक झळकण्यापूर्वी भाजपा खासदार अशोक चव्हाण यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांचे अभिनंदन केले. आपल्या मजकुरात त्यांनी या चौघांच्या आधी जरांगे पाटील यांचे अभिनंदन करण्याची खबरदारी घेतल्याचे दिसून आले. त्यांच्या या पोस्टवर नंतर चौफेर टीका झाली. या सगळ्या घडामोडींमध्ये आपण कोठे होतात, असा सवाल अनेकांनी त्यांना उद्देशून विचारला.
मराठा आंदोलनादरम्यान नांदेडमधील महायुतीच्या काही लोकप्रतिनिधींची छायाचित्रे असलेला एक फलक लागला होता. हे लोकप्रतिनिधी आंदोलकांना भेटण्यासाठी मुंबईला गेले नाहीत म्हणून त्यांचा निषेध नोंदविण्यात आला. त्यात अन्य आमदारांसोबत अशोक चव्हाण यांचेही छायाचित्र समाविष्ट होते, पण त्यावर त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया नोंदविली नाही. काही लोकप्रतिनिधींनी मात्र फलक झळकल्यावर आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचे स्पष्ट केले. काँग्रेसचे खासदार रवींद्र चव्हाण यांनी आधीच पाठिंबा देण्याची खबरदारी घेतली होती. त्यामुळे ते सकल मराठा समाजाच्या रोषातून सुटले.
नांदेड दक्षिण जिल्हा भाजपाचे अध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांनीही मुख्यमंत्री फडणवीस यांचे अभिनंदन करणारा मोठा फलक शहराच्या मध्यवर्ती भागात लावला आहे. ‘मराठा समाजाला न्याय देणारा एकमेव नेता,’ असे त्यात फडणवीस यांचे वर्णन करण्यात आले आहे. नांदेडमधील भाजपाचे जुने कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांपैकी अनेकजण फडणवीसभक्त समजले जातात. त्यांतील प्रमुख जुन्या कार्यकर्त्यांनी या फलकबाजीच्या चढाओढीत अलिप्तता राखली.
मनोज जरांगे यांनी मंगळवारी सायंकाळी उपोषण समाप्त केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणातील शिष्टाईचे श्रेय मराठा आरक्षणविषयक मंत्रिमंडळ उपसमितीला दिले. पण आता अभिनंदनाचे फलक लावणाऱ्यांनी उपसमितीच्या यशाचा साधा उल्लेखही केलेला नाही. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे समर्थक भागवत देवसरकर यांनी मात्र विखे पाटील यांनी दिलेल्या योगदानाबद्दल सविस्तर उल्लेख केला आहे.