सोलापूर : महावितरणने थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी शेतकऱ्यांची वीज खंडित करण्याची मोहीम तीव्र केल्याचे पडसाद शेतकऱ्यांमध्ये उमटले आहेत. माढा तालुक्यातील मोडनिंब येथे शेतकऱ्यांची शेतीमाल डोक्यावर घेऊ न महावितरण शाखेच्या कार्यालयावर मोर्चा काढला असता त्यात वीज अभियंत्यापुढे स्वत: पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी १७ शेतकऱ्यांविरूध्द टेंभुर्णी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण समितीचे माजी सभापती शिवाजी कांबळे यांनी नेतृत्व केलेल्या या आंदोलनात वीज उपकार्यकारी अभियंता उध्दव जानव यांच्या जीवितास धोका निर्माण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. शिवाजी कांबळे यांच्यासह संतोष मारूती गायकवाड (वय ३५), नागेश अर्जुन गायकवाड (वय ३६), दीपक सर्जेराव कदम (वय २४, रा. वरवडे, ता. माढा), पोपट एन. वसेकर (वय २७), सुभाष व्ही. तागतोडे (वय ३७), अमर हरिदास बचाटे (वय २७), संग्राम बचाटे (वय २५), संजय जगन्नाथ पाटील (वय ४२), मारूती शिंदे (वय ४५, रा. अरण, ता. माढा), नाना सोलनकर (वय ४२) दत्तात्रेय त्र्यंबक धायगुडे (वय २९, रा. सोलनकरवाडी, ता. माढा), संतोष नानासाहेब पाटील (वय ३१), आकाश वसंत लोकरे (वय २६, रा. उजनी टेंभुर्णी, ता. माढा), संजय भीमराव जाधव (वय ५६, रा. जाधववाडी, ता. माढा), रणजित रमेश महाडिक (वय ३२), मेष बाळासाहेब मते (रा. मोडनिंब, ता. माढा) अशी गुन्हा नोंद झालेल्या शेतकऱ्यांची नावे आहेत. एकीकडे पावसाने ओढ दिल्यामुळे शेतातील पिके.करपू लागली आहेत, तर दुसरीकडे कशीबशी पाण्याची सोय करून तयार झालेला भाजीपाला, फळेभाज्यांचे दर प्रचंड प्रमाणात कोसळले आहेत. यातच करोनाचे संकट कायम राहिल्याने ग्रामीण अर्थकारण अद्यपि निराशाजनक आहे. त्यातच थकीत वीज बीलवसुलीसाठी महावितरणने शेतकऱ्यांची वीज तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल महावितरणने वीजबील समजून स्वीकारावा आणि वीज खंडित करू नये, अशी मागणी केली आहे.