राहाता : अभिनेता आयुष्मान खुराना व अभिनेत्री रश्मिका मंदान्ना यांनी आज, मंगळवारी शिर्डीत साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. दिवाळीच्या मुहूर्तावर २१ ऑक्टोबरला प्रदर्शित होणाऱ्या त्यांच्या आगामी ‘थामा’ या चित्रपटाच्या यशासाठी दोघांनीही साईबाबांच्या चरणी प्रार्थना केली.

साईबाबांच्या दर्शनानंतर माध्यमांशी बोलताना अभिनेता आयुष्मान खुराना म्हणाला की, १७ वर्षांपूर्वी साईबाबांच्या दर्शनासाठी आलो, त्यावेळी मात्र साईबाबांचे समाधानकारक दर्शन झाले नव्हते. त्यावेळी मुखदर्शन घेऊन मनाला समाधान मानले होते. तेव्हापासून साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याची संधी शोधत होतो.

मात्र अखेर साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याची संधी मिळाली. साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन मनाला खूप समाधान आणि आनंद मिळाला. रश्मिका मंदान्नान हिने सांगितले की, साईबाबांच्या दर्शनासाठी मी याआधी ‘छावा’ चित्रपटाच्या यशासाठी आले होते. आज पुन्हा दर्शनाची संधी मिळाल्याने माझ्यासाठी एक चमत्कार आहे.

आयुष्मान खुराना आणि रश्मिका मंदान्ना यांनी प्रथम द्वारकामाईत जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेतले. नंतर दोघांनी साईच्या गुरुस्थान मंदिराचेही दर्शन घेतले. दोघांचा साईबाबा संस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.

चाहत्यांमध्ये उत्सुकता

अभिनेत्री रश्मिका मंदान्ना याआधीही अभिनेता विकी कौशलबरोबर छावा चित्रपटाच्या यशासाठी शिर्डीत येऊन साईबाबांच्या दर्शनाला आली होती. आयुष्मान आणि रश्मिका यांचा थामा हा बहुप्रतीक्षित चित्रपट दिवाळीच्या शुभमुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळं साईबाबांच्या आशीर्वादानंतर या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे.

संस्थानच्या कर्मचाऱ्यांबद्दल नाराजी

साईबाबांच्या समाधीचे दर्शनासाठी राजकीय, सामाजिक, धार्मिक व चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवर सातत्याने शिर्डीत येतात. त्यावेळी त्यांच्यासोबत छायाचित्र काढण्यासाठी संस्थानमधील अधिकारी व कर्मचाऱ्यांची चढाओढ असल्याचे दिसून येते. या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वर्तनाबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपट प्रदर्शनापूर्वी विशेषत: हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंत साई दरबारी धाव घेत चित्रपटाच्या यशासाठी साकडे घालत असतात. त्यामुळे प्रसिद्ध अभिनेता, अभिनेत्री यांची सातत्याने साई दरबारी वर्दळ सुरू असते.

गायक सोनू निगम यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर निगम यांनी सांगितले की, मी १९९२ पासून शिर्डीत येत आहे. आज मी येथे काही मागण्यासाठी नाही, तर श्री साईबाबांचे आभार मानण्यासाठी आलो आहे. माझ्या आयुष्यात जे काही मिळाले ते सगळे बाबांच्या कृपेनेच अशी भावना व्यक्त करत दोन साईभजने सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.