कराड : ख्यातकीर्त भारत फोर्ज लिमिटेडचे अध्यक्ष, नामांकित उद्योजक पद्मभूषण बाबा कल्याणी यांना यंदाचा ‘पी. डी. पाटील महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष डॉ. अशोकराव गुजर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. गुजर म्हणाले, पी. डी. पाटील गौरव प्रतिष्ठान गेली तीन दशके कराड परिसरात सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे. कराडचे सलग ४२ वर्षे नगराध्यक्ष म्हणून पी. डी. पाटील यांनी काम पाहिले होते. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी प्रतिष्ठानने सन २०११ पासून ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सुरू केला. या पुरस्काराचा उद्देश महाराष्ट्राची कीर्ती जगभर नेणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करणे, हा आहे.
या पुरस्काराचे पहिले मानकरी शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर होते. त्यानंतर डॉ. जयंत नारळीकर, डॉ. प्रकाश आमटे, डॉ. जब्बार पटेल, डॉ. अभय बंग, नसीमा हुरजूक, डॉ. शा. बं. मुजुमदार, डॉ. रणजित जगताप, डॉ. शिवाजीराव कदम, डॉ. चंद्रकांत लोखंडे, डॉ. जेष्ठराज जोशी आणि अरुण जोशी यांचाही समावेश या पुरस्कारप्राप्त मान्यवरात आहे.