देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये ऑक्सिजन अभावी रुग्णांचे मृत्यू झालेत की नाही? या मुद्द्यावरून देशाच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. केंद्र सरकारने सोमवारी संसदेमध्ये ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाल्याची नोंद नाही, असं जाहीर केल्यानंतर विरोधकांकडून केंद्राला लक्ष्य केलं जात आहे, तर केंद्र सरकारने राज्यांनीच ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याची आकडेवारी दिली आहे, अशी भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊतांनी केंद्र सरकारवर टीका केल्यानंतर त्याला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“…याचा म्हणे राऊतांना धक्का बसला!”

ऑक्सिजनअभावी एकही रुग्ण दगावला नसल्याची केंद्राची माहिती ऐकून आपल्याला धक्का बसल्याचं संजय राऊत यांनी म्हटल्यानंतर आता अतुल भातखळकर यांनी त्यावर टीका करत संजय राऊतांना खोचक सल्ला दिला आहे. “मे महिन्यात ठाकरे सरकारने मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं होतं की राज्यात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू नाही. केंद्राचे अहवाल राज्याने दिलेल्या माहितीच्या आधारेच बनतात. केंद्राने ठाकरे सरकारच्या माहितीच्या आधारे तसाच अहवाल बनवला. या अहवालाचा म्हणे संजय राऊत यांना धक्का बसला”, असं ट्वीट अतुल भातखळकर यांनी केलं आहे.

 

“आता तोच न्याय स्वत:लाही लावा”

दरम्यान, या आकडेवारीनंतर केंद्र सरकारवर खटला दाखल करण्याची मागणी संजय राऊत यांनी केली आहे. त्यावरून देखील अतुल भातखळकर यांनी संजय राऊतांना सुनावलं आहे. “अहो संजय राऊत, निर्लज्जपणालाही मर्यादा असतात. ठाकरे सरकारने न्यायालयात केलेले खोटे दावे लक्षात राहत नसतील तर लिहून ठेवत जा. मग असे धक्के बसणार नाहीत. राऊत आता लोकांना केंद्र सरकारविरुद्ध केस दाखल करायला सांगत आहेत. मग आता तोच न्याय स्वत:लाही लावा”, असं भातखळकर यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

 

संजय राऊत काय म्हणाले होते?

“ज्यांचे नातेवाईक ऑक्सिजनअभावी मरण पावले. जे ऑक्सिजनसाठी सिलेंडर्स घेऊन धावत होते. त्यांचा यावर विश्वास बसतो का, हे सांगायला हवं. ऑक्सिजनअभावी अनेक राज्यांमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांनी सरकारवर खटला दाखल केला पाहिजे. उत्तर लेखी असो किंवा मौखिक; सरकार सत्यापासून पळत आहे. बहुतेक हा पेगॅससचा परिणाम आहे,” अशी टीका राऊत यांनी मोदी सरकारवर केली होती.

 

“संजय राऊत जी, धक्का तर आम्हाला बसला आहे” – वाचा सविस्तर

भाजपाची आगपाखड!

दरम्यान, संजय राऊत यांच्या या टीकेनंतर भाजपाकडून त्याचा खरपूस शब्दांमध्ये समाचार घेतला जात आहे. “महाराष्ट्र सरकारने मे महिन्यात मा. उच्च न्यायालयात ऑक्सिजनअभावी राज्यात एकही मृत्यू झाला नाही, असं प्रतिज्ञापत्र दिलंय. मग राज्य सरकारवरही राऊतजी खटला भरणार आहेत का?”, असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे. तर, “संजय राऊतांना कदाचित पूर्ण माहिती नाही. संजय राऊत म्हणत होते की आम्हाला धक्का बसला. अशा मृत्यूंमुळे धक्का बसलाच पाहिजे. पण खोट्या बाबींवर तुम्ही राजकारण करत असाल, तर आम्हाला धक्का बसला आहे. तुम्ही अशा विषयांवर राजकारण करत आहात”, असं भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले आहेत.