आपल्यापैकी बहुतेकांच्या घरी फ्रीज ही किचनमधली एक अत्यावश्यक बाब ठरला आहे. विशेषत: उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तर फ्रीज म्हणजे आपला तारणहारच! पण याच फ्रीजमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे मोठा ब्लास्ट होऊन एका घरातल्या तीन खोल्यांमधल्या सामानाची काही वेळात राख झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धुळे जिल्ह्यातल्या शिरपूरमध्ये ही गंभीर घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी लागलेल्या आगीत तीन लाखांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

नेमकं घडलं काय?

शिरपूरच्या गणेश कॉलनीमध्ये ही घटना घडली आहे. २३ मार्च अर्थात बुधवारी गणेश कॉलनीतील फ्लॅट क्रमांक ३१मध्ये राहणाऱ्या शिरसाठ कुटुंबियांना फ्रीजमध्ये झालेल्या स्फोटाचा मोठा फटका सहन करावा लागला. शिरसाठ कुटुंबीय खरंतर बाहेरगावी राहातात. गणेश कॉलनीतल्या त्यांच्या घरी भाडेकरू राहात असून मागील बाजूस कॉलेजचे काही विद्यार्थी भाडेतत्वावर राहातात.

बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास घरातल्या फ्रीजच्या कॉम्प्रेसरला शॉर्टसर्किटमुळे आग लागली. यामुळे झालेल्या स्फोटामुळे ही आग घरभर पसरली. या आगीत तीन खोल्यांमधील फ्रीज, पंखे, कूलर, टीव्ही, कपडे आणि इतर सामानाची राख झाली. तसेच, यात काही महत्त्वाची कागदपत्र देखील जळून खाक झाल्याचं सांगण्यात येत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घरात आग लागल्याचं समजताच आसपासच्या नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केलं. तसेच, काही नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत घरातील गॅस सिलेंडर आधी बाहेर काढले. यामुळे मोठा अनर्थ टळला. अग्निशमन दलाचे दोन बंब माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी तातडीने ही आग आटोक्यात आणली.