अकोला : राज्यातील महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनापूर्वीच तेथे दुर्घटनांचे सत्र सुरू आहे. उन्नत वन्यजीव मार्गाच्या कमानीचा भाग कोसळण्याची घटना ताजी असतानाच बुलढाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजाजवळील समृद्धी महामार्गावरील निर्माणाधीन पुलाचा भाग (गर्डर) कोसळला. महामार्गाच्या पॅकेज ७ मध्ये पिंपळखुटा गावाजवळ दोन डोंगराळ प्रदेशाला जोडणाऱ्या उड्डाणपुलावर ही दुर्घटना बुधवारी रात्री घडली. या अपघातात पुलाखालील उभ्या ट्रेलरचे मोठे नुकसान झाले. अपघातात जीवितहानी टळली.

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गातील नागपूर ते वाशीम जिल्ह्यातील शेलू बाजार अशा २१० किमी लांबीच्या मार्गाचे उद्घाटन २ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. मात्र, नागपूरजवळ पहिल्या टप्प्यात वन्यजीवांसाठी बांधण्यात येत असलेल्या एका उन्नत मार्गाचा भाग कोसळला. त्यामुळे उद्घाटन लांबणीवर पडले. आता सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळखुटा गावाजवळ दोन डोंगराळ भागाला जोडणाऱ्या  उड्डाणपुलाचा जवळपास २०० टन वजनाचा गर्डर ८० फुटावरून खाली पडला. हा पूल ५०० मीटर लांबीचा असून ८० फूट उंच आहे.

काम आणखी लांबणीवर?

दुर्घटना घडली, त्यावेळी कामगार भोजनासाठी गेल्याने ते बचावले. या अपघातामुळे समृद्धी महामार्गाचे काम आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.