शनिवारी (१ जुलै) रात्री दीडच्या सुमारास बुलढाणा येथे समृद्धी महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सुमारे २५ जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ८ जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची ही घटना समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात हळहळ व्यक्त केली आहे. याप्रकरणी सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला ताब्यात घेतलं आहे.

या घटनेची अधिक माहिती देताना बुलढाण्याचे अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी यांनी सांगितलं की, “समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावाजवळ बसचा अपघात झाला आहे. यामध्ये २५ लोक मृत्यूमुखी पडले आहेत, तर ८ लोक जखमी झाले आहेत. या अनुषंगाने सिंदखेडराजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १४०/२३ कलम २७९, ३०४, ३३७, ३३८, ४२७ आणि मोटर वाहन कायदा १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी चालकाला ताब्यात घेतलं आहे.”

हेही वाचा- नाशिक-पुणे महामार्गावर स्कूल बस आणि शिवशाहीचा विचित्र अपघात, एसटीचा पत्रा तुटला अन्…

नेमकं काय घडलं?

खासगी प्रवासी बस नागपूरहून पुण्याच्या दिशेने चालली होती. रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला आहे. या बसमध्ये नागपूर, वर्धा आणि यवतमाळ येथील प्रवासी होती. विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस (एमएच २९ बीई १८१९) होती. बस सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावाजवळ समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि बसने पेट घेतला. या घटनेत २५ प्रवाशांचा मृत्यू झाला.

हेही वाचा-  समृद्धी महामार्ग बस अपघात: घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया; म्हणाले, “अपघातग्रस्तांना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही बस ३० जूनला नागपूरहून संध्याकाळी ५ वाजता पुण्यासाठी निघाली होती. १ जुलैच्या रात्री १.२२ मिनिटांनी धावत्या गाडीचे समोरील टायर अचानक निघाल्याने ट्रॅव्हल्स समृद्धी महामार्गावरील पुलावरील दुभाजकाला धडकून उलटी झाली. त्यानंतर काही मिनिटांमध्ये गाडीचा स्फोट होऊन ही खासगी प्रवासी बस पेटली आणि ही दुर्घटना घडली.