सावंतवाडी : आगामी दसरा आणि दिवाळीच्या सणांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) ते सावंतवाडी रोडदरम्यान विशेष साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू केली जाणार आहे. त्यामुळे मुंबईतून कोकणात येणाऱ्या पर्यटकांना आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. ही सेवा १७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत एकूण ८ फेऱ्या चालवणार आहे.

​गाडीचे वेळापत्रक:

​गाडी क्रमांक ०११७९ ही विशेष साप्ताहिक गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून १७, २४, ३१ ऑक्टोबर आणि ७ नोव्हेंबर २०२५ रोजी दर शुक्रवारी सकाळी ८:२० वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री ९:०० वाजता सावंतवाडी रोड येथे पोहोचेल.परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०११८० ही सावंतवाडी रोड येथून त्याच तारखांना (१७, २४, ३१ ऑक्टोबर आणि ७ नोव्हेंबर २०२५) प्रत्येक शुक्रवारी रात्री १०:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी १०:४० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल.

​महत्त्वाचे थांबे आणि गाडीची रचना:

​ही विशेष गाडी कोकणातील महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे. यात ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अदावली, विलवडे, राजापूर, वैभववाडी रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांचा समावेश आहे.

​या रेल्वेत एकूण २२ डबे असणार आहेत, ज्यात एसी फर्स्ट क्लास (१), एसी-२ टियर (३), एसी-३ टियर (७), स्लीपर क्लास (८), पॅन्ट्री कार (१) आणि जनरेटर व्हॅन (२) यांचा समावेश असेल.

​गणेशोत्सवादरम्यान कोकण रेल्वे मार्गावर सोडण्यात आलेल्या विशेष गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्याचप्रमाणे दसरा-दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये सुरू होणाऱ्या पर्यटन हंगामाला ही विशेष सेवा आणखी चालना देईल, अशी अपेक्षा आहे.