सिंदेवाही येथील लाडबोरी गावात शनिवारी रात्री आकाशातून रिंग पडल्याने एकच खळबळ उडाली. अवशेष बंद पडलेल्या सॅटेलाईटचे असल्याची माहिती आहे. तर रविवारी सकाळी सिंदेवाही तालुक्यातील पवनपार गुंजेवाहीजवळ गोल आकाराचा अवशेष नागरिकांना मिळाला आहे. हा अवशेष हायड्रोजन टँकसारखा दिसत असून त्याचा उपयोग सॅटेलाईटमध्ये उपकरण सिस्टीम सारखा उपयोग केला जातो.
सध्या अभ्यासक यावर संशोधन करीत असून याबाबत लवकरच अचूक माहिती पुढे येईल असे सांगण्यात येत आहे. दरम्यान सिंदेवाही परिसरातील या दोन्ही गावांना अभ्यासक सकाळपासून भेटी देत आहेत. लोखंडी रिंग इलेक्ट्रॉन रॉकेट बुस्टरचेच तुकडे असल्याचे सांगण्यात येत आहे. न्यूझीलंड येथील माहीया द्वीपकल्पावरुन भारतीय वेळेनुसार सायंकाळी 6.11 वाजता तेथील रॉकेट लॅब कंपनीच्या इलेक्ट्रॉन रॉकेटद्वारे ब्लॅकस्काय नावाचा उपग्रह पृथ्वीच्या 430 किमी उंचीवर नेऊन स्थिरावण्यात आला. केवळ एकाच रॉकेट उड्डाणाची नोंद असल्याने सायंकाळी उत्तर – पूर्व महाराष्ट्रात दिसलेली घटना ही या इलेक्ट्रॉन रॉकेटच्या बुस्टरचेच असावेत. आपल्या भागात साधारण तीस ते पस्तीस किमी उंचीवरून बुस्टर वातावरणाशी घर्षण झाल्याने एकामागोमाग एक असे ते जळत गेले.
दिसणार्या घटनेचा मार्ग व प्रकाशमान याचा अंदाज घेतला तर ही कोणतीही उल्का वर्षाव किंवा उडती तबकडीसारखी घटना नाही असा दावा एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्र, औरंगाबादचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी केला आहे. दरम्यान याबाबत जिल्हा प्रशासन अधिकृत माहिती घेत आहेत.