अलिबाग: रायगड जिल्ह्यात काँग्रेसचा आणखी एक नेता राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या गळाला लागला आहे. मुष्ताक अंतुले यांच्या पाठोपाठ आता अलिबागमधील नेता राष्ट्रवादी काँग्रेसच्या कंपुत दाखल होणार आहे. जिल्हा कमिटी आणि प्रदेश सरचीटणीस पदावर कार्यरत राहिलेल्या या नेत्यांने पक्षात ताळमेळ राहिला नसल्याचे म्हणत पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात गेल्या काही वर्षापासून सुरू असलेली पक्षाची वाताहत थांबण्याची चिन्ह दिसत नाहीत. एकामागून एक मातब्बर नेते पक्ष सोडून जात आहे. प्रदेश पातळीवरून पक्षाला लागलेली गळती रोखण्यासाठी कुठलीही पाऊले उचलली जातांना दिसून येत नाही, त्यामुळे जिल्ह्यात पक्षाला एकसंघ ठेऊ शकेल असा एकही नेता राहिलेला नाही. आघाडीच्या राजकारणात जिल्ह्यातील पक्षसंघटनेकडे दुर्लक्ष करण्याचे पक्षश्रेष्टींचे धोरण संघटनेच्या मुळावर आले असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे.
आधी रामशेठ ठाकूर आणि प्रशांत ठाकूर यांनी भाजपत प्रवेश केला. त्यामुळे पनवेल तालुक्यातील पक्षसंघटना अडचणीत आली. नंतर माजी मंत्री रविंद्र पाटील भाजपात दाखल झाले. त्यामुळे पेण विधानसभा मतदारसंघातील पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले. प्रतिकूल परिस्थितीत महाड विधानसभा मतदारसंघात पक्षाने अस्तित्व टिकून ठेवले होते. मात्र माणिक जगताप यांच्या निधनानंतर मतदारसंघातील पक्षाची धुरा संभाळणाऱ्या स्नेहल जगताप पक्षाला सोडून गेल्या त्यामुळे महाडच्या पक्षसंघटनेला घरघर लागली. श्रीवर्धन मतदारसंघातून बॅरिस्टर अंतुले यांचे जावई मुष्ताक अंतुलेही पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये दाखल झाले, त्यामुळे श्रीवर्धनमधील पक्षसंघटना रसातळाला गेली.
अलिबाग, उरण मध्ये पक्षात थोडीशी धुगधुगी टिकून होती. मात्र आता तिथेही खासदार सुनील तटकरे यांनी पक्षाला सुरूंग लावला आहे. आधी काँग्रेसच्या श्रीधर भोपी यांचा पक्षात प्रवेश करून घेतला आणि आता प्रदेश सरचिटणीस पदावर काम केलेल्या अँड. प्रविण ठाकूर यांनाच फोडण्यात तटकरे यशस्वी झाले आहेत. प्रविण ठाकूर येत्या २ ऑगस्टला अलिबाग येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश करणार आहेत. आधीच अडचणीत असलेल्या काँग्रेस पक्षासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
प्रविण ठाकूर हे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे चिंरजीव आहेत. त्यांनी जिल्हा आणि प्रदेश कमिटीवर काम केले आहे. अलिबाग नगर परिषदेत नगर सेवक म्हणून त्यांनी काम केले आहे. रायगड जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे. २००९ च्या लोकसभा निवडणूकीत त्यांनी बंडखोरी करत बॅरीस्टर अंतुले यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. आता मात्र पक्षात ताळमेळ राहीला नाही आणि कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जात असल्याचे कारण देत त्यांनी पक्षत्याग करत असल्याचे जाहीर केले आहे. अलिबागमधील हॉराईजन हॉल येथे संध्याकाळी पाच वाजता त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे.
रायगड जिल्ह्यातून एकेकाळी काँग्रेसचे तीन ते चार आमदार निवडून येत असत, आज जिल्ह्यात काँग्रेसचा एकही आमदार नाही. सद्यपरिस्थितीत एखादा आमदार निवडून आणता येईल अशी परिस्थिती ही शिल्लक राहिलेली नाही. कोकणातील संघटनेच्या बाबत असलेले प्रदेश कमिटीचे उदासिन धोरण याला कारणीभूत ठरत आहे. आधी लोकसभा, नंतर विधानसभा आणि शेवटी जिल्हा परिषद पातळीवरून पक्षाचे अस्तित्व संपुष्टात आले. त्यामुळे अधोगतीकडे वाटचाल निरंतर सुरू राहिली आहे.